प्रतिनिधी / नागठाणे :
पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एकास बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना माजगाव फाटा (ता.सातारा) येथील स्नॅक्स सेंटरवर घडली. यामध्ये विवेक रामचंद्र शितोळे (वय.२६,रा मूळ.पांगीरे (अ),ता.चिकोडी,जि. बेळगाव-कर्नाटक,हल्ली रा.मोशी,पुणे) हा गंभीर जखमी झाला. हल्लेखोर व जखमी दोघेही कर्नाटक राज्यातील असून, बोरगाव पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने सातजणांना ताब्यात घेतले.
किरण नेमा शितोळे, शिवकुमार कृष्णा कांबळे, प्रवीण बाबासो धरकार, प्रज्वल सुकुमार कांबळे, राजेंद्र देवदत्त राजहंस, सौरभ तानाजी हेडगे व संतोष शामराव भोसले (सर्व रा.मागूर,ता.निपाणी,जि.बेळगाव-कर्नाटक) यांना बोरगाव पोलीस ठाण्याचे सपोनि डॉ.सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळिंबीकर व कर्मचाऱ्यांनी स्थानिकांच्या मदतीने ताब्यात घेतले. एक मारुती ओम्नी कारही जप्त केली आहे. जखमी विवेक शितोळे याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रविवारी रात्री उशिरा बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आली. हवालदार महाडिक पुढील तपास करत आहेत.