आरोग्यमंत्र्यांच्या विधानामुळे निर्माण झालेला गोंधळ दूर करण्याचा प्रयत्न
प्रतिनिधी /बेंगळूर
राज्यात दहावी परीक्षेची तारीख निश्चित करण्यासंबंधी शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांनी एकतर्फी निर्णय घेतलेला नाही. आपल्याशी चर्चा केल्यानंतरच त्यांनी हा निर्णय घेतला आहे, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी दिले आहे. दहावी परीक्षेची तारीख घोषित करण्याबाबत शिक्षणमंत्र्यांनी आपल्याशी कोणतीही चर्चा केली नसल्याचे आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी सांगितले होते. त्यामुळे गोंधळ निर्माण झाला होता. हा गोंधळ दूर करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला आहे.
शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांनी परीक्षेच्या तारखेची घोषणा करण्याआधी आपल्याची चर्चा केली आहे. त्यानंतरच त्यांनी तारीख निश्चित केली आहे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय एकतर्फी नाही, असे ट्विट मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
दहावी परीक्षेची तारीख निश्चित केल्याच्या मुद्दय़ावरून गोंधळ निर्माण केला जात आहे. याला महत्त्व देऊ नये, असे सांगून येडियुराप्पा यांनी दहावी परीक्षेबाबत आपल्याशी चर्चा करण्यात आली नसल्याची प्रतिक्रिया देणाऱया डॉ. सुधाकर यांचे विधानाला महत्त्व नसल्याचे स्पष्ट केले आहे.
आरोग्यमंत्री डॉ. सुधाकर यांनी सोमवारी रात्री शिक्षणमंत्र्यांच्या विरुद्ध प्रतिक्रिया दिल्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला उत आला होता. विरोधी पक्षातील नेत्यांनीही यावरून सरकारला टिकेची झोड उठवली होती. त्यामुळे मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी हस्तक्षेप करून परीक्षेच्या निर्णयाबद्दल ट्विटरवरून स्पष्टीकरण दिले आहे.
मुख्यमंत्र्यांची संमती घेतली होती : एस. सुरेशकुमार
मुख्यमंत्र्यांची संमती आणि आरोग्य खात्याचा सल्ला घेतल्यानंतरच आपण दहावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे, असे स्पष्टीकरण प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांनी दिले आहे. दहावी परीक्षेची घोषणा करण्याआधीच आपण आरोग्य खात्याचा सल्ला घेतला होता. त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्यांची संमती घेतली आहे, अशी प्रतिक्रिया सुरेशकुमार यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
आरोग्यमंत्र्यांचा ‘यु टर्न’
दहावी परीक्षेची तारीख निश्चित करण्याविषयी शिक्षणमंत्र्यांनी आपल्याशी चर्चा केली नाही, असे विधान केलेल्या आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी आता ‘यु टर्न’ घेतला आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करूनच शिक्षणमंत्री सुरेशकुमार यांनी दहावी परीक्षेचा निर्णय घेतला आहे. आपण सोमवारी दुसऱया बैठकीत सहभागी होतो. त्यामुळे सुरेशकुमार यांनी कोविड तांत्रिक सल्लागार समितीशी चर्चा केली असावी, अशी सारवासारव डॉ. सुधाकर यांनी केली आहे.