प्रतिनिधी /पणजी
सांगेचे आमदार प्रसाद गावकर यांचे बंधू संदेश गावकर यांनी असंख्य समर्थकांसह सोमवारी रितसर काँग्रेस प्रवेश केला. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत व प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.
पणजीत काँग्रेस मुख्यालयात हा प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता. मळकर्णेचे पंचसदस्य असलेले संदेश गावकर, गजानन रायकर, सरपंच लिओना रॉड्रिगीश यांचे पती बाप्तिश्ट रॉड्रिगीश, संतोष नाईक, अनिल मठकर, सर्वेश नाईक, पावटो गावकर, प्रज्योत कुर्डीकर, कायतान बार्रेटो, यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला.
भाजप सरकारची सध्याची वाटचाल गोव्याला संपवून टाकणारी असल्यामुळे विद्यमान सरकारच्या कारभाराला कंटाळून आपण काँग्रेस पक्षात प्रवेश केला, असे त्यांनी सांगितले. गेल्या साडेचार वर्षात साळावली धरण, वनाधिकार, संजीवनी कारखाना यासारखे अनेक प्रश्न घेऊन आम्ही लढलो. परंतु एकही प्रश्न सोडविण्यात सरकारने प्रयत्न केले नाहीत वा त्यांना यशही आले नाही. सांगेतील लोकांच्या कोणत्याही समस्या सोडविण्यात या सरकारने स्वारस्य दाखविले नाही, असे यावेळी सांगण्यात आले.
पेट्रोल डिझेलची दरवाढ करून या सरकारने लोकांना कंगाल करून टाकले आहे. भरीस खाणी बंद, गृहआधार योजना रखडली आहे. अशा अनेक प्रकारे या सरकारने लोकांना पिडले आहे. अशा परिस्थितीत भाजपच्या सोबतीत आणखी राहणे शक्य नाही. त्यामुळे काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला, असे अनिल मठकर व संतोष नाईक यांनी सांगितले.
दिगंबर कामत यांनी सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत केले. सांगेतील सर्व समस्यांची आपणास जाणीव आहे. आपण त्या प्रत्यक्ष अनुभवलेल्या आहेत. त्यामुळे प्राधान्याने सोडविणार येतील, असे आश्वासन त्यांनी दिले.
चोडणकर यांनी त्यावेळी बोलताना निवडणुकीत उमेदवारी कुणाला द्यायची हा निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.