राहुल गांधी यांच्यासोबतच्या बैठकीची कथित इनसाइड स्टोरी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
कोरोना संकटादरम्यानही देशात आता राजकीय घडामोडी वेगाने घडू लागल्या आहेत. पुढील वर्षी अनेक राज्यांमध्ये होणाऱया विधानसभा निवडणुकीसह राष्ट्रपतिपदाची निवडणूक तसेच 2024 च्या लोकसभा निवडणुकीवरून हालचाली सुरू झाल्या आहेत. निवडणूक व्यूहनीतिकार प्रशांत किशोर यांची मंगळवारी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यासोबत झालेली भेट याचाच एक महत्त्वाचा भाग आहे. या भेटीत शरद पवार यांचा राष्ट्रपतिपदाचे उमेदवार म्हणून विचार करण्यात आल्याचे समजते.
सर्व विरोधी पक्षांना एकत्र करण्यासाठी प्रशांत किशोर प्रयत्नशील असल्याचे मानले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना राष्ट्रपतिपदाचे उमेदवार म्हणून सादर करण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे. प्रशांत किशोर यांनी पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीनंतर किमान तीनवेळा पवारांची भेट घेतली आहे हे विशेष.
2022 मध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ पूर्ण होणार आहे. अशा स्थितीत देशाला कदाचित नवे राष्ट्रपती मिळू शकतात. सर्व विरोधी पक्ष एकत्र आल्यास इलेक्टोरल कॉलेजप्रकरणी सरकारसमोर मजबुती मिळेल, तसेच विरोधी पक्षांसोबत बीजदचे नवीन पटनायक आल्यास हा मार्ग सोपा होईल असे गणित प्रशांत किशोर यांनी मांडल्याची चर्चा आहे. महाराष्ट्र आणि तामिळनाडू यासारख्या मोठय़ा राज्यांमध्ये सध्या विरोधी पक्षांचे सरकार आहे, अशा स्थितीत तेथून मोठे पाठबळ मिळण्याची अपेक्षा आहे. पण ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक पूर्णपणे विरोधी गटात उभे राहिल्याचे दिसून आलेले नाहीत. याप्रकरणी प्रशांत यांनी पटनायक आणि एम.के. स्टॅलिन यांचीही भेट घेतल्याचे सूत्रांकडून समजते.
काँग्रेससमोर मांडली योजना
राहुल गांधी, प्रियंका वड्रा यांच्यासोबत प्रशांत यांची झालेली बैठक विरोधकांना एकत्र आणण्याच्या प्रयत्नांचा हिस्सा असल्याची चर्चा आहे. राहुल आणि प्रशांत यांची ही भेट दोन तासांहून अधिक वेळ चालली. विरोधी पक्ष एकत्र आल्यास भाजपचा गेमप्लॅन उधळता येईल, मग 2024 च्या निवडणुकीपूर्वी हे लाभदायक ठरेल असे पीकेंचे मानणे आहे.
अनेक नेत्यांशी चांगले संबंध
प्रशांत किशोर यांचे ममता बॅनर्जी, जगनमोहन रेड्डी, अरविंद केजरीवाल, एम. के. स्टॅलिन, उद्धव ठाकरे समवेत अन्य काही नेत्यांसोबत चांगले संबंध आहेत. अशा स्थितीत त्यांना सोबत घेणे अवघड ठरणार नाही, पण यात काँग्रेसची साथ त्यांना आवश्यक वाटत आहे. मंगळवारी झालेल्या बैठकीत सोनिया गांधी यांनीही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सामील झाल्याचे मानले जात आहे. प्रशांत यांच्याकडून काँग्रेस नेतृत्वाला राजकीय धोरणांचे एक सादरीकरण करण्यात आले, ज्यात काँग्रेसला विविध राज्यांच्या स्थितीची कल्पना देण्यात आली.