नवी दिल्ली/ वृत्तसंस्था
केंद्र सरकारने विशिष्ट कारणांसाठी उपयोगात आणल्या जाणाऱया सिंगल युज प्लास्टिक वस्तूंवरील बंदीची नियमावली घोषित केली आहे. या वस्तूंचे उत्पादन, आयात, साठवणूक, वितरण किंवा विक्री इत्यादींवर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये कप, बशी, कटलरी, पॅकिंग सामुग्री, खोकी, सिगारेट पॅकेटस् इत्यादींचा समावेश आहे. प्लास्टिक कॅरीबॅग्सच्या जाडीमध्ये बदल करण्यात आला असून ही जाडी 50 मायक्रॉन्सवरून 75 मायक्रॉन्स करण्यात आली आहे. नव्या जाडीच्या प्लास्टिक कॅरीबॅग्स 30 सप्टेंबर 2021 पासून लागू होतील. तर 31 डिसेंबर 2021 पासून 120 मायक्रॉन्स जाडीच्या कॅरीबॅग्स लागू होतील.
पॉलिस्टिरीन आणि एक्स्पांडेड पॉलिस्टिरीन यांच्यापासून बनलेल्या वस्तूंवर 1 जुलै 2022 पासून बंदी घालण्यात येणार आहे. इयर बड्स, आयस्क्रिम स्टिक्स, सजावटीचे थर्मोकल, चमचे, काटे चमचे, सुऱया, नळय़ा (स्ट्रॉ), ट्रे, रॅपिंग किंवा पॅकिंग फिल्म्स, आमंत्रण पत्रिका इत्यांदींवरही बंदी घालण्यात येणार आहे. 100 मायक्रॉन जाडीपेक्षा कमी पीव्हीसी बॅनर्स निर्बंधांच्या कक्षेत आले आहेत.
अन्य नियम
वरील निर्बंधांमध्ये न येणारे प्लास्टिक पॅकेजिंग वेस्ट नियमानुसार व्यवस्थापित करणे आणि नाहीसे करणे आवश्यक आहे. त्यांचे व्यवस्थापन पर्यावरणस्नेही पद्धतीने करणे अनिवार्य करण्यात आले आहे. 2016 च्या प्लास्टिक वेस्ट व्यवस्थापन नियमानुसार उत्पादकांचे उत्तरदायित्व निर्धारित करण्यात आले आहे.