प्रतिनिधी/ सातारा
सातारा पोलीस दलाच्यावतीने जेष्ठ नागरिक दिनानिमित्त त्यांना बोलावून त्यांच्या अडचणी समजून घेत विविध कायद्यांची त्यांना माहिती देण्यात आली. पोलिस दलाच्या या उपक्रमामुळे जेष्ठ नागरिकांना आधार मिळाला.
पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या उपस्थित या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पोलिस मुख्यालयाच्या पाठीमागे ‘भरोसा सेल’ आहे. याद्वारे महिला, लहान मुले, व जेष्ठ नागरिकांच्या अडचणी सोडवल्या जातात. 1 सप्टेंबर हा जागतिक जेष्ठ नागरिक दिन असल्याने त्याचे आयोजन केले असता त्यासाठी विविध जेष्ठ नागरिक संघातील व सातारा शहरातील अनेक वृद्ध उपस्थित होते. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिता अंमदे-मेणकर यांनी सिनिअर सिटीझन ऍक्टच्या तरतुदींची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. जेष्ठ नागरिकांच्या हक्काच्या जनजागृतीसाठी यावेळी पॉवर पार्टटचे सादरीकरण करण्यात आले. जेष्ठ नागरिकांसाठी सातारा पोलीस दलाच्यावतीने 1090 हा हेल्पलाईन असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी जेष्ठ नागरिकांनीही आपली मनोगते व्यक्त करून विविध प्रश्न उपस्थित केले. दरम्यान, पोलिस दलाच्या या उपक्रमाचे वृद्धांनी आभार मानले. यावेळी पोलिस हवालदार व्ही.ए.राऊत, ए.ए. लोखंडे, एन.डी चव्हाण, टी. एच. मोहिते, एस.बी. काळेल, पी.व्ही. वाघमारे उपस्थित होते.