प्रतिनिधी /बेळगाव
खडेबाजार पोलीस स्थानकासमोरील रिसालदार गल्ली येथील वडाच्या झाडाची फांदी विद्युतभारीत तारेवर कोसळली. त्यामुळे विद्युतभारीत तार तुटून लोंबकळत होती. सुदैवाने त्यावेळी तेथून ये-जा करणारे कोणीच नसल्याने मोठा अनर्थ टळला. या झाडाखालीच कार पार्किंग करण्यात आली होती. मात्र बाजूला फांदी पडल्याने कारचे नुकसान टळले. या घटनेनंतर तातडीने पोलिसांनी बॅरिकेड्स लावले व हेस्कॉमला कळवून विद्युत पुरवठा खंडित केला.
गेल्या काही दिवसांपासून वाऱयासह जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे झाडांच्या फांद्या पडून नुकसान होत आहे. सोमवारी वाळलेली फांदी अचानक तुटून विद्युत तारांवर कोसळली. त्यामुळे विद्युत तार तुटली. जोरदार आवाज आल्यामुळे अनेकजण त्याकडे धावले. तातडीने पोलिसांनी बॅरिकेड्स लावले. याचबरोबर नागरिकांनाही सावधानतेचा इशारा दिला. या रस्त्यावरील वाहतूक दुसऱया रस्त्यावरून वळविण्यात आली होती.