नेहरुनगर बसवाण्णा मंदिरापासून सुरुवात : विविध ठिकाणी जल्लोषात स्वागत : शिवबसवनगर येथील जोतिबा मंदिरात सांगता
प्रतिनिधी /बेळगाव
हिंदुत्व व धर्म प्रत्येक तरुणाच्या मनात बिंबवला जावा, या उद्देशाने दुर्गामाता दौड सुरू झाली. दौडच्या स्वागतासाठी उभारण्यात आलेल्या कमानी, भगवे झेंडे, भगव्या पताका, पारंपरिक वेष परिधान केलेले तरुण दुर्गामाता दौडमध्ये सहभागी होतात. त्यामुळे दौडमध्ये एक भगवेमय वातावरण पाहायला मिळते. पाचव्या दिवशीच्या दौडमध्येही असेच भगवेमय वातावरण पाहायला मिळाले.
पाचव्या दिवशीच्या दौडला नेहरुनगर येथील बसवाण्णा मंदिरापासून सुरुवात झाली. परमेश्वर हेगडे यांच्या हस्ते ध्वज चढविण्यात आला. शहाजी ठक यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी महेश जुवेकर, गजानन पाटील, सतीश पाटील, शरद पाटील, प्रमोद पाटील, संजय सुतार, आकाश ठक उपस्थित होते. रामदेव हॉटेलमार्गे दुर्गामाता चौक येथून शिवबसवनगर येथील जोतिबा मंदिरात सांगता झाली.
माळमारुती पोलीस स्थानकाचे निरीक्षक सुनील पाटील यांच्या हस्ते ध्वज उतरविण्यात आला. यावेळी जोतिबा मंदिर ट्रस्ट पदाधिकारी व शिवप्रतिष्ठानचे जिल्हाप्रमुख किरण गावडे, शहरप्रमुख अजित जाधव, शहर कार्यवाह विश्वनाथ पाटील, तालुका प्रमुख परशराम कोकितकर, विभाग प्रमुख पुंडलिक चव्हाण यांच्यासह धारकरी उपस्थित होते.
बुधवारच्या दौडचा मार्ग…
सातव्या दिवशीच्या दौडला मिलिटरी महादेव मंदिर येथील शिवतीर्थ येथून प्रारंभ होणार आहे. काँग्रेस रोडमार्गे, गोगटे सर्कल, खानापूर रोड, संचयनी सर्कल, धर्मवीर संभाजी चौक, कॉलेज रोड, यंदे खूट, समादेवी गल्ली येथून संयुक्त महाराष्ट्र चौकात सांगता होणार आहे.
खडा पहारासाठी नावनोंदणी…
संभाजी भिडे गुरुजींच्या प्रेरणेतून रायगड येथे 32 मण सुवर्णसिंहासनाच्या पुनर्स्थापनेचा संकल्प करण्यात आला आहे. त्यासाठी मोठय़ा प्रमाणात निधीचे संकलनदेखील सुरू आहे. या सुवर्णसिंहासनाच्या पहाऱयाची संधी शिवभक्तांना मिळणार आहे. प्रत्येक तालुकावार याचे नियोजन करण्यात येत असून कोरोनामुळे अर्धवट राहिलेली नावनोंदणी दौडवेळी पूर्ण केली जात आहे. गावागावातील शिवभक्तांना खडा पहारासाठी नावनोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाप्रमुख किरण गावडे यांनी केले आहे.