कराडातील दोघा युवकांवर खुनाचा गुन्हा
प्रतिनिधी/ कराड
गेल्या आठवडय़ात शनिवारी दुपारी भोई गल्लीतील युवकाला कराडच्या दत्त चौकात चाकूने भोसकल्याची घटना घडली होती. हल्ल्यात गंभीर झालेल्या युवकावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू असताना बुधवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला. सुशांत उर्फ बबलू मुरलीधर काटकर (रा. भोई गल्ली, रविवार पेठ, कराड) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर हल्लेखोरांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरिक्षक अमित बाबर यांनी दिली.
खून प्रकरणी बैजुनाथ अशोक जिरगे (वय 29, रा. दत्त चौक, कराड) व अजय उर्फ पिल्या अभयकुमार काळे (25, रा. शुक्रवार पेठ, कराड) यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कराडच्या रविवार पेठ परिसरातील सुशांत ऊर्फ बबलू याचा संशयित बैजुनाथ व अजय यांच्याशी किरकोळ कारणावरून वाद झाला होता. या वादावर तात्पुरता पडदा पडला होता मात्र संशयितांच्या मनात भांडणाचा राग होता. दरम्यान शनिवारी 25 डिसेंबर रोजी सुशांत हा कामानिमित्त दुपारी तीन वाजता दत्त चौक परिसरात गेला होता.
भरचौकात चाकूने भोसकले होते
सुशांत याच्याशी तेथे संशयित बैजुनाथ व अजय यांची पुन्हा बाचाबाची झाली. शुक्रवारी झालेल्या वादातून त्यांच्यात भररस्त्यात भांडण व झटापट सुरू झाली. सुशांतला शुक्रवारच्या भांडणाचा जाब विचारत संशयितांनी मारहाण सुरू केली. झटापट सुरू असतानाच संशयित अजयने सुशांत ऊर्फ बबलूचे हात धरले त्याचवेळी बैजूनाथ याने त्याच्याकडील धारदार चाकूने सुशांतच्या पोटावर खोलवर वार केले. चाकूचा वार वर्मी बसल्याने सुशांत जागेवरच रक्तबंबाळ अवस्थेत कोसळला. त्यानंतर दोघा संशयितांनी तेथून पलायन केले. भररस्त्यात वर्दळीच्या ठिकाणी हा प्रकार सुरू होता.
वार वर्मी बसल्याने सुशांतचा मृत्यू
संशयित हल्लेखोरांनी सुशांत ऊर्फ बबलूच्या पोटात चाकूने भोसकले होते. त्यामुळे अतिरक्तस्त्राव सुरू होता, असे पोलिसांनी सांगितले. मित्र व नागरिकांच्या मदतीने सुशांतला उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. या प्रकरणी दोघा संशयितांवर प्राणघातक हल्ला केल्या प्रकरणी कराड शहर पोलिसात शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान सुशांतवर खासगी रूग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. तो उपचारांना प्रतिसादही देत होता, मात्र बुधवारी पहाटे त्याची प्रकृती खालावल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. सुशांतचा मृत्यू झाल्यावर संशयितांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला. कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने संशयित हल्लेखोरांना अटक केली आहे. सुशांत रविवार पेठेत कुटुंबासह राहात होता. त्याचा कराड परिसरात मोठा मित्रपरिवार होता. त्याच्या मृत्यूची बातमी समजताच सकाळीच शहर पोलीस ठाणे व रूग्णालयाच्या आवारात मित्रपरिवाराची गर्दी झाली होती.
आठवडय़ात हल्ल्याच्या दोन घटना
मलकापूर येथे भरचौकात विश्वास येडगे या तरूणावर पाचजणांनी धारदार शस्त्राने हल्ला चढवला होता. या हल्ल्यातील जखमी येडगे हा अजुनही रूग्णालयात उपचार घेत आहे. ही घटना ताजी असतानाच शनिवारी सुशांत ऊर्फ बबलू याच्यावरही कराडच्या दत्त चौकात भररस्त्यात चाकूहल्ला झाला. यात बबलूचा मृत्यू झाला आहे. एकाच आठवडय़ात घडलेल्या दोन घटनांनी खळबळ उडाली आहे.