बेळगाव-पणजी महामार्गासाठी खासदार अनंतकुमार हेगडे यांना निवेदन : आवश्यक प्रयत्न करण्याचे खासदारांचे आश्वासन
प्रतिनिधी /खानापूर
बेळगाव-पणजी राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण व दुपदरीकरणात जमीन संपादित झालेल्या शेतकऱयांना नुकसानभरपाई मंजुरीसाठी बेळगाव जिल्हाधिकाऱयांकडे जबाबदारी सोपवावी, या मागणीचे निवेदन भाजपच्या शिष्टमंडळाने माजी केंद्रीय मंत्री खासदार अनंतकुमार हेगडे यांना सादर केले. सदर प्रस्ताव राज्य शासनाने केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठविला आहे. त्याला लवकर मंजुरी मिळविण्यासाठी आपण विशेष प्रयत्न करण्याची मागणी जिल्हा भाजप उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने खासदारांकडे केली.
बेळगाव-पणजी राष्ट्रीय महामार्ग दुपदरीकरणासाठी हलगा, वडगाव, येळ्ळूर, देसूर, मच्छे, झाडशहापूर आदी बेळगाव तालुक्यातील गावांची तसेच प्रभूनगर, निट्टूर, इदलहोंड, गणेबैल, अंकले, हत्तरगुंजी, हलकर्णी, खानापूर, करंबळ, होनकल, गंगवाळी, शिंदोळी, माणिकवाडी, गुंजी ते लेंढा, रामनगर, अनमोड हद्दीतील शेतकऱयांची जमीन संपादित केली आहे. या जमिनीला प्रांताधिकारी बेळगाव यांनी कवडीमोल नुकसानभरपाई मंजूर केली आहे. त्या विरुद्ध शेतकऱयांनी योग्य किंमत मिळावी, यासाठी वरिष्ठ लवादाकडे दाद मागितली आहे.
वरिष्ठ लवादाची जबाबदारी सध्या बेळगाव रिजनल ऑफीसमधील अधिकाऱयावर सोपविली असून त्यांच्याकडे महामार्ग व पाणी योजना संपादित जमिनींची बरीच प्रकरणे प्रलंबित आहेत. यामुळे बेळगाव-पणजी महामार्ग चौपदरीकरण व दुपदरीकरणासाठी जमीन संपादित झालेल्या शेतकऱयांना त्या लवादाकडून लवकर न्याय मिळणे कठीण असल्याने बेळगाव-पणजी राष्ट्रीय महामार्गातील जमीन संपादित प्रकरणासाठी लवाद म्हणून बेळगाव जिल्हाधिकाऱयांवर जबाबदारी सोपविल्यास जमीन संपादित झालेल्या शेतकऱयांच्या जादा किंमतीसाठी केलेल्या अपिलाची प्रकरणे लवकर निकाल लागून वेळेत न्याय मिळू शकेल.
या पूर्वीच राज्य शासनानेही तसा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठविला आहे. आपण जातीनिशी लक्ष घालून तो प्रस्ताव विनाविलंब मंजूर होण्यासाठी प्रयत्न करावा, अशी विनंती निवेदनात केली आहे. सदर मागणी योग्य असून आपण रस्ते वाहतूक मंत्र्यांशी संपर्क साधून त्या प्रस्तावाला शक्य तितक्या लवकर मंजुरी मिळण्यासाठी प्रयत्न करण्याचे खासदार अनंतकुमार हेगडे यांनी आश्व़ासन दिले आहे.
सांस्कृतिक भवनासाठी निधी मंजूर करा
कर्नाटक राज्य कन्नड सांस्कृतिक विभागाकडून गडीनाडू भवन बांधण्यासाठी निधी मंजूर केला जातो. पण खानापूर तालुक्यात आतापर्यंत एकही गडीनाडू सांस्कृतिक भवन मंजूर झालेले नाही. यामुळे खानापूरचे ग्रामदेवता रवळनाथ मंदिर, भुतनाथ डोंगरावरील भुतनाथ मंदिर तसेच बैलूर व आमटे येथील मंदिर परिसरात सांस्कृतिक भवन बांधण्यासाठी प्रत्येकी 25 लाख रुपये निधी मंजूर करावा, अशी मागणीदेखील यावेळी शिष्टमंडळाने केली.
अनंतकुमार हेगडे यांनी यावर तातडीने कन्नड सांस्कृतिक मंत्री सुनीलकुमार यांच्याशी संपर्क साधून त्यांचे याकडे लक्ष वेधले असता त्यांनी चारही ठिकाणी सांस्कृतिक भवनासाठी प्रस्ताव पाठवून द्या, त्याला तातडीने मंजुरी देऊ, अशी ग्वाही दिली आहे.
पंतप्रधान सडक योजनेखाली निधी मंजूर करा
खानापूर तालुक्यात गेल्या चार वर्षात 50 कि. मी. रस्ते विकासासाठी पंतप्रधान सडक योजनेखाली निधी मंजूर झाला आहे. त्यापैकी अद्याप चार रस्त्याची कामे प्रलंबित आहेत. अद्याप तालुक्यात बरेच रस्ते पक्के होणे गरजेचे आहे. यासाठी पंतप्रधान सडक योजनेखाली निधी मंजूर करावा, अशीही विनंती शिष्टमंडळाने खासदारांना केली असता, यावर्षी देखील आणखी 50 कि. मी. रस्त्यांच्या विकासासाठी पंतप्रधान सडक योजनेखाली निधी मंजूर केला जाईल, अशी ग्वाही खासदार अनंतकुमार हेगडे यांनी दिली. यावेळी प्रमोद कोचेरी यांच्यासमवेत भाजपचे तालुका सचिव गुंडू तोपिनकट्टी यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.