शिवपाल यादवांचे दुःख आले समोर ः अखिलेश यांना मानले नेता
उत्तरप्रदेश निवडणुकीत काका शिवपाल यादव भलेही पुतण्या अखिलेश यांच्यासोबत दिसून येत असले तरीही त्यांच्या मनात कमी जागा मिळण्याचे शल्य आहे. समाजवादी पक्ष अध्यक्षांकडे स्वतःच्या पक्षासाठी 100 जागा मागितल्या होत्या, परंतु मिळाली केवळ एक. तरीही अखिलेश यांनाच नेता मानल्याचे शिवपाल यांनी म्हटले आहे.
अखिलेश यांच्यासोबत वाद झाल्यानेच शिवपाल यांनी समाजवादी पक्षातून बाहेर पडण्याचे पाऊल उचलले होते. परंतु यंदाच्या निवडणुकीपूर्वी दोघांमध्ये आघाडी झाली आहे. इटावा जिल्हय़ातील जसवंत नगर मतदारसंघातून शिवपाल हे निवडणूक लढवत आहेत. ते मतदारसंघात घरोघरी जात मते मागत आहेत.
प्रगतिशील समाजवादी पक्षासाठी 100 जागा मागितल्या होत्या, परंतु अखिलेश यांनी हे प्रमाण अधिक असल्याचे सांगितले. मग 50 जागा तरी मिळाव्यात असा विचार केला, त्यानंतर 30 जागांकरता चर्चा झाली, परंतु मिळाली एकच असे शिवपाल यांनी समर्थकांना संबोधित करताना म्हटले आहे.
मी स्वतःच्या पक्षाचे बलिदान केले आहे, आघाडीद्वारे निवडणूक लढवत असलो तरीही अखिलेश यांना स्वतःचा नेता मानले असल्याचे ते म्हणाले. जसवंतनगर मतदारसंघात काँग्रेसने उमेदवार उभा केलेला नाही, परंतु शिवपाल यांच्यासमोर भाजप आणि बसपचे आव्हान आहे. तिसऱया टप्प्यात 20 फेब्रुवारी रोजी येथे मतदान होणार आहे.