काम बंदसाठी 24 तासांची मुदत : अन्यथा परत आंदोलन करण्याचा इशारा,सरकारी अधिकाऱयांच्या कृतिचा निषेध
प्रतिनिधी /पेडणे
मोपा विमानतळ प्रकल्पासाठी होणाऱया ‘लिंक रोड’चे काम बंद ठेवा अशी नोटीस पंचायतीने पाठवूनही त्याला केराची टोपली दाखवत काम राजरोसपणे चालू ठेवण्याचा आदेश भूसंपादन अधिकारी चंद्रकांत शेटकर यांनी दिल्याच्या निषेधार्थ काल रविवारी नागझर, तुळसकरवाडी, वारखंड परिसरातील नागरिकांनी आंदोलन केले. शेटकर हे घटनास्थळी न आल्याने त्यांचा निषेध करत नंतर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. काम बंद करा, पंचायतीच्या आदेशाचे पालन करा, अशी जोरदार मागणी यावेळॅ करण्यात आली.
वारखंड पंचायतीचे सरपंच संजय तुळसकर यांनी मोपा लिंक रोडचे काम कायदेशीर मार्गाने होत नसल्याची तक्रार ग्रामस्थांकडून आल्यानंतर काम बंद ठेवण्याची नोटीस जारी केली. सात दिवसात सर्व कागदपत्रे पंचायतीच्या कार्यालयात सादर करण्याचा आदेश संबंधितांना दिला होता. दुसऱया दिवशी भूसंपादन अधिकारी चंद्रकांत शेटकर, पेडणे तालुका उपजिल्हाधिकारी राजेश आजगावकर व इतर अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
अधिकाऱयांची पंचायतीवर जबरदस्ती
अधिकाऱयांनी जबरदस्तीने काम सुरू करण्यास सांगितले तसेच आम्हाला पंचायत लागत नाही आणि आम्ही काम सुरू ठेवणार असे ठणकावून पंचायतीला सांगितले. तसेच महिला व ग्रामस्थांकडे अरेरावीची भाषा केली. पंचायतीच्या नोटिशीला किंमत न दिल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थ रस्त्यावर उतरले. सकाळी निषेध सभा घेऊन त्या सभेतच भूसंपादन अधिकारी चंद्रकांत शेटकर, उत्तर गोवा जिल्हाधिकारी व तसेच इतर संबंधित अधिकाऱयांना घटनास्थळी बोलवा किंवा काम बंद ठेवा, अशी ग्रामस्थांनी मागणी करत आपल्या भूमिकेशी ठाम राहिले.
पीडित शेतकरी, ग्रामस्थांकडून रस्ता बंद
यावेळी आंदोलनकर्त्यांनी ‘आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा’ हा आवाज शेतकऱयांचा, हा आवाज पेडणेकरांचा, चंद्रकांत शेटकर मुर्दाबाद अशा घोषणा हातात फलक घेऊन दिल्या. सरकारी अधिकाऱयांचा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी निषेध केला.
अनेक वक्त्यांकडून सरकारचा निषेध
विविध भागातील पर्यावरणप्रेमी तसेच विविध क्षेत्रातील नागरिकांनी येऊन आंदोलनाला पाठिंबा दिला. मोपा विमानतळ पंचक्रोशी पीडित जन संघटनेचे अध्यक्ष भरत बागकर, वारखंड नागझर पंचायतीचे सरपंच संजय तुळसकर, पंच मंदार परब, पंच प्रदीप कांबळी, माजी मुख्याध्यापक दयानंद मांदेकर, वकिल जितेंद्र गावकर, वकिल प्रसाद शहापूरकर, शैलेंद्र वेलिंगकर, गोवा स्वाभिमानी पार्टीचे माथाईस, म्हापसा शेतकरी संघटनेचे संजय बर्डे, समाजसेवक वॉल्टर लोबो, संदीप कांबळी, सुदेश तिवरेकर, व्यंकटेश नाईक, रेखा महाले, बाया वरक, राजमोहन शेटय़े आदीनी सरकारच्या दंडेलशाही कृतीचा निषेध केला.
चार तास रास्ता रोको आंदोलन
ग्रामस्थांच्या मागणीकडे उपस्थित अधिकाऱयांनी तेवढं लक्ष न दिल्याने नंतर ग्रामस्थ आक्रमक झाले. रस्ता रोखण्याचा निर्णय घेतला. जवळ जवळ चार तास रास्ता रोको केल्यानंतर उपस्थित अधिकाऱयांनी चर्चा सुरू केली. उपजिल्हाधिकारी राजेश आजगावकर घटनास्थळी दाखल होत आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. आंदोलन कार्यकर्त्यांनी कुठल्या आधारावर चंद्रकांत शेटकरने काम सुरू ठेवण्याचा आदेश कामगारांना दिला याचे स्पष्टीकरण मागितले. तसेच पंचायतीला या कामकाजासंदर्भात काहीच लागत नाही हा जो दावा अधिकारी करतात तो कुठल्या आधारावर आहे यावर स्पष्टीकरण मागितले. ते आंदोलनकर्त्यांना समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही. यावेळी अधिकाऱयांना घटनास्थळीच बोलवा आशी मागणी लावून धरली. यावर राजेश आजगावकर यांनी सांगितले की तुमचे योग्य ते निवेदन आम्हाला द्या आम्ही त्यावर विचार करू. त्या गोष्टीला आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट नकार दिला व अधिकारी घटनास्थळी येऊ शकत नाही तर काम बंद ठेवा अशी मागणी केली.
काम बंद ठेवण्याचे आदेश असतानासुद्धा रस्त्याचे काम चालू आहे ते आपण कायदेशीररित्या बंद करावे अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी घटनास्थळी उपस्थित असलेल्या निरीक्षक विक्रम नाईक यांच्याकडे केली. यावर नाईक यांनी सांगितले की, या संदर्भात आपल्याला निवेदन मिळालेले आहे, आपण वरि÷ांशी चर्चा करुन योग्य ती कार्यवाही करतो. यावर आंदोलनकर्त्यांनी कार्यवाही 24 तासाच्या आत करावी अशी जोरदार मागणी केली. जर ही मागणी पूर्ण होऊन मोपा लिंक रस्त्याचे काम बंद ठेवले नाही तर परत बैठक घेऊन आंदोलन तीव्र करणार व त्याला जबाबदार पेडणे पोलीस निरीक्षक विक्रम नाईक असणार असा इशारा दिला. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला.