जुना फुलेवाडी रिंग रोड, गंगाई लॉन ते नरसिंह कॉलनीचा रस्ता आजही कागदावर, क्रांतीसिंह नाना पाटील नगर विकास कृती समिती आक्रमक, महापालिकेला 22 मार्चचा अल्टिमेटम
प्रतिनिधी / कोल्हापूर
जुना फुलेवाडी रिंगरोड आणि गंगाई लॉन ते नरसिंह कॉलनी या रस्त्यांच्या कामांसाठी गेली दीड वर्षे विविध प्रकारची आंदोलने केल्यानंतरही महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने कंटाळलेल्या क्रांतीसिंह नाना पाटील नगर विकास कृती समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे. 22 मार्च पर्यंत या रस्त्यांबाबत महापािलका प्रशासनाकडून ठोस कार्यवाही झाली नाही तर 23 मार्चला शहीद दिनी आत्मदहन करण्याचा इशारा कृती समितीवतीने माजी नगरसेवक अमोल माने आणि निमंत्रक सुहास आजगेकर यांनी दिला आहे.
या संदर्भात महापालिकेच्या गांधी मैदान विभागीय कार्यालयाचे उपशहर अभियंता एन. एस. पाटील यांना कृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. त्यामध्ये भागातील नागरिकांच्या व्यथा व आजवर केलेल्या आंदोलनांची माहिती दिली आहे. तसेच चिवा बाजार येथे रास्ता रोको, रस्त्यावरील खड्डा केप कापून लक्ष वेधणारे आंदोलन असो वा प्रशासनाला निवेदने देणे असो अशी विविध आंदोलने केल्यानंतरही महापालिका प्रशासन दखल घेत नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आंदोलनानंतर महापालिका प्रशासनाने भेट देवून रस्त्याचे काम सुरू करण्याचे आश्वासन दिले. पण प्रत्यक्षात कोणतीही कृती केलेली नाही.
त्यामुळे आम्ही आंदोलने करून कंटाळलो आहोत. 22 तारखेपर्यंत रस्त्याची कामे सुरू करण्यासंदर्भात ठोस कार्यवाही झाली नाही तर 23 मार्चला गांधी मैदान विभागीय कार्यालयासमोर आत्मदहन केले जाईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.