वार्ताहर/ लोटे
खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील संकल्प कंपनीत रविवारी दुपारी 3.10 च्या सुमारास आग लागली. आगीत कंपनीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने जीवितहानी टळली आहे. वसाहतीत वर्षभरातील आगीची ही तिसरी घटना असून कंपनी व्यवस्थापनाकडून सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याच प्रकारच्या उपाययोजना कार्यान्वित नसल्याचे वारंवार घडणाऱया आगीच्या घटनांवरून दिसून येत आहे.
या कंपनीत चार कामगार कार्यरत होते. आग लागल्याचे लक्षात येताच कामगारांनी प्रसंगावधान राखत कंपनीबाहेर सुरक्षितस्थळी धाव घेतली. एका इलेक्ट्रीक मोटरला शॉर्टसर्किट होवून आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत असून महावितरण खात्याला या बाबत कळवल्यानंतर परिसरातील वीजपुरवठा तातडीने खंडित करण्यात आला. तसेच एम.आय.डी.सी.च्या अग्निशमक दलास पाचारण करण्यात आले. दलाच्या कर्मचाऱयांनी कंपनीच्या आवारात जावून पाण्याच्या फवाऱयाचा मारा करत आग आटोक्यात आणली. या कर्मचाऱयांबरोबरच परिसरातील ग्रामस्थांनीही आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आपआपल्या परीने प्रयत्न केल्याचे दिसले. तब्बल 2 तासांनी आग आटोक्यात आणण्यात यश आले.
आगीत कंपनीची मोठय़ा प्रमाणात हानी झाली असून लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. आग आटोक्यात आणल्यानंतर खंडित वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. आगीचा पंचनामा करण्याचे काम संबंधित प्रशासनाकडून सुरू आहे. लोटे औद्योगिक वसाहतीत वर्षभरात आगीची ही तिसरी घटना असून ठोस उपाययोजनांअभावी वसाहतीतील संबंधित कंपनी व्यवस्थापन आगीच्या घटना रोखण्यात अपयशी ठरत आहेत. यामुळे वसाहतीतील कंपन्यांमधील कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.