प्रतिनिधी /मडगाव
गेली दोन वर्षे कोविड महामारीमुळे अनेक व्यवसाय ठप्प झाले होते. त्यात प्रामुख्याने टेलरिंगचा (कपडे शिवण्याचा) व्यवसायाचा समावेश होता. मात्र, आत्ता कोविड नियंत्रणात येत असल्याने टेलरिंगचा व्यवसाय हळूहळू पूर्वपदावर येऊ लागला आहे. शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाला असून विद्यार्थी शाळेत जात असल्याने टेलरकडे शाळांचे गणवेष शिवण्यासाठी पुन्हा ऑर्डर येऊ लागल्या आहेत.
मडगाव शहरात अनेक टेलर आहेत. गेल्या दोन वर्षात त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागला. असा बसा काही जणांनी आपला व्यवसाय चालू ठेवला होता. तर काहीं जणांनी ग्राहक नसल्याने व्यवसाय बंद ठेवला होता. मात्र, आत्ता कोविड नियंत्रणात असल्याने ग्राहक पुन्हा कपडे शिलाईसाठी येऊ लागले आहेत. त्यात शाळा सुरू झाल्याचे विद्यार्थ्यांचे गणवेष शिवण्यासाठी बऱयापैकी ऑर्डर मिळालेला आहेत.
आत्ता कोणताही सण किंवा उत्सव असो लोकांचा कल हा रेडिमेड गार्मेन्टकडे जास्त असतो. त्यामुळे पूर्वी प्रमाणे कपडे शिवून घेण्याच्या भानगडीत पडत नाही. आपल्या हव्या शैलीत व हव्या ते आकारात रेडिमेड कपडे मिळात. त्यामुळे टेलरिंग व्यवसायासमोर आव्हान निर्माण झाले होते. त्यात कोविडमुळे हा व्यवसाय जवळपास ठप्पच झाला होता.
विद्यार्थ्यांचे गणवेष शिवून देण्याच्या कामात सद्या शिंपी दिवस-रात्र काम करताना आढळून येतात. शाळा सुरू होऊन एक आठवडा पूर्ण झाला तरी बऱयाच विद्यार्थ्यांना त्यांचे गणवेष शिवून मिळालेले नाहीत. पुढील आठवडय़ापर्यंत बहुताश विद्यार्थ्यांना गणवेष शिवून मिळतील अशी माहिती शिंप्याकडून देण्यात आली. गेली दोन वर्ष टेलरिंग व्यवसाय जवळपास ठप्प झाला होता. त्यामुळे अनेक टेलरनी आपल्या कर्मचाऱयांना कामावरून कमी केले होते. आत्ता हळूहळू स्थिती पूर्वपदावर येत असल्याने कर्मचाऱयांना सुद्धा पुन्हा कामावर रूजू करून घेण्यात आलेले आहे.
कोविड अशाच प्रकारे नियंत्रणात राहिल्यास टेलरिंग व्यवसाय बऱयापैकी चालू शकतो. मात्र, दोन वर्षात जे नुकसान झाले ते भरून काढण्यासाठी तेव्हढाच कालावधी लागू शकतो. कारण आज टेलरिंग व्यवसायासमोर रेडीमेड गार्मेन्टचे आव्हान असल्याची माहिती देण्यात आली.