आ. शिवेंद्रसिंहराजे; स्वखर्चातून रस्त्याचे मुरुमीकरण, खडीकरण
प्रतिनिधी/सातारा
सातारा शहरातील कोणताही भाग विकासापासून वंचित राहू नये यासाठी नेहमीच प्रयत्न केला असून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी कायम प्राधान्य दिले आहे. आकाशवाणी झोपडपट्टी येथील अंतर्गत रस्त्याची दुरवस्था झाली होती. नागरिकांच्या मागणीवरून या रस्त्याच्या मुरुमीकरण, खडीकरणाचे काम सुरु केले आहे. दिवाळीनंतर या रस्त्याचे डांबरीकरण करू, असा शब्द देतानाच काहीही झाले तरी,आगामी काळात आकशवाणी झोपडपट्टी परिसराचा कायापालट करणारच, असे आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले.
आकशवाणी झोपडपट्टी येथील आर्यांग्ल वैद्यक महाविद्यालय ते महानुभ मठ या अंतर्गत रस्त्याची खडय़ांमुळे दुरवस्था झाली होती. पावसामुळे या रस्त्यावरून ये-जा करणे जिकीरीचे बनले होते. या रस्त्यावर मुरूम आणि खडी टाकून मिळावी अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन कांबळे यांनी आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्याकडे केली होती. आ. शिवेंद्रसिंहराजेंनी शासकीय फंडाची वाट न पाहता स्वखर्चातून सदर रस्त्याचे मुरूमीकरण आणि खडीकरण करून दिले असून या कामाचा शुभारंभ आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी सचिन कांबळे, बबलू जाधव, निलेश चाळके, रोशन जगताप, शशी कदम, रवींद्र बाबर, आप्पा सकटे, जतीन वाघमारे, रवी सकटे, राजू वैराट, जगदीश नगरे, अनिता पाटोळे, शोभा बाबर, माया पिसाळ, ज्योती बोभाटे, ज्योती गंगावणे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, सचिन कांबळे हा एक होतकरू युवक असून त्याला या भागातील समस्यांची चांगली जाण आहे. त्याच्या आणि येथील नागरिकांच्या मागणीनुसार येथील शौचालय व अन्य समस्या सोडवल्या असून आगामी काळात या भागाचा निश्चितच कायापालट करू. या रस्त्यासाठी कोणीही फंड दिलेला नाही. नागरिकांची समस्या सोडवण्यासाठी स्वखर्चातून हे काम केले असून दिवाळीनंतर डांबरीकरण करून या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावू. येथील नागरिकांनी कोणालाही घाबरण्याचे कारण नाही. कोणी येईल, काहीही सांगेल, दमदाटी करेल, अशा लोकांना घाबरू नका. असे काही झाल्यास मला सांगा, मी तुमच्यासाठी 24 तास उपलब्ध आहे, असेही आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.