तालुका म. ए. समितीचे आवाहन
प्रतिनिधी/ बेळगाव
सीमाभागात मोठय़ा संख्येने मराठी भाषिक राहतात. त्यामुळे कायद्यानुसार या सर्व भाषिकांना मराठी भाषेतून परिपत्रके देणे बंधनकारक आहे. मात्र कर्नाटक सरकार जाणूनबुजून कायदा पायदळी तुडवून मराठी भाषिकांवर अन्याय करत आहे. त्यामुळे मराठी भाषिकांनी आता त्या विरोधात तीव्र लढा लढण्याचा निर्धार केला असून मोर्चानंतर आता सोमवार दि. 8 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे. तेव्हा आंदोलनामध्ये तालुक्मयातील सर्व कार्यकर्त्यांनी आणि मराठी भाषिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन तालुका म. ए. समितीतर्फे करण्यात आले आहे.
सीमाभागामध्ये 25 लाखांहून अधिक मराठी भाषिक एकत्र राहत आहेत. 1981 च्या अल्पसंख्याक कायद्यानुसार या सर्वांना मराठीमधून परिपत्रके दिली पाहिजेत. मात्र अजून कोणतीच पावले उचलण्यात आली नाहीत. त्यामुळे गैरसोय निर्माण झाली आहे. त्यासाठी आता सोमवारी सकाळी 11 वाजता धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तरी या आंदोलनामध्ये मोठय़ा संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन तालुका म. ए. समितीचे अध्यक्ष निंगोजी हुद्दार, कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, माजी महापौर शिवाजी सुंठकर, मनोज पावशे, उपाध्यक्ष राजाभाऊ पाटील, चिटणीस ऍड. एम. जी. पाटील, खजिनदार एस. एल. चौगुले, युवा अध्यक्ष संजय मंडलिक, म्हात्रू झंगरुचे यांनी केले आहे.