विविध जबाबदाऱयांमुळे महसूल विभागाचे कर्मचारी हैराण
प्रतिनिधी /बेळगाव
महापालिका महसूल विभागातील कर्मचाऱयांवर विविध कामांच्या जबाबदाऱया सोपविण्यात आल्या आहेत. महसूल वसुली, पडझड झालेल्या घरांचे सर्वेक्षण, खातेबदल आणि कार्यालयीन कामकाजाची जबाबदारी असताना आता मतदार यादीला आधार लिंक करण्याचे काम देण्यात आले आहे. परिणामी कामाचा ताण वाढल्याने जबाबदाऱयांमध्ये कपात करण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी महसूल विभागातील कर्मचाऱयांनी महापालिका कर्मचारी संघटनेला निवेदन दिले.
प्रत्येक कामासाठी महसूल विभागातील कर्मचाऱयांना जुंपण्यात येत आहे. परिणामी कर्मचाऱयांवर कामाचा ताण वाढला आहे. महसूल वसुली चलन देणे, खाते बदल करणे तसेच मालमत्तांची माहिती घेऊन ई-अस्ती प्रणालीवर नोंद करणे अशा जबाबदाऱया सोपविण्यात आल्या आहेत. पण या कामांव्यतिरिक्त पडझड झालेल्या घरांचे जीपीएस सर्व्हेक्षण करणे, अनधिकृत जाहिरात फलक हटविणे, धोकादायक घरांची माहिती घेणे, अतिक्रमण हटविणे, मतदारयादी तयार करणे, झोपडपट्टी वसाहतीचे सर्वेक्षण करणे, लीज मालमत्तांची माहिती घेणे अशा विविध कामांची जबाबदारी सोपविण्यात आल्याने महसूल विभागातील कर्मचाऱयांवर कामाचा ताण वाढला आहे. त्यामुळे कर्मचाऱयांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कर्मचाऱयांना आरोग्याच्या समस्या निर्माण होत असून कामाचा ताण कमी करण्यात यावा याकरिता महापालिका कर्मचारी संघटनेने पुढाकार घेऊन महापालिका प्रशासनाशी चर्चा करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सदर निवेदन कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मलिकार्जुन गुंडप्पण्णावर यांना देण्यात आले. यावेळी महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.