मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांची उपस्थिती; संभाजीराजे यांच्यासह मराठा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रण
मुंबई, कोल्हापूर / प्रतिनिधी
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसह इतर प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी गुरूवारी (25 ऑगस्ट) मुंबईतील सहय़ाद्री शासकीय विश्रामगृहात महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बैठकीत उपस्थित राहणार आहेत. स्वराज्य संघटनेचे संस्थापक संभाजीराजे छत्रपती यांच्यासह मराठा क्रांती मोर्चा, अखिल भारतीय मराठा महासंघ, संभाजी ब्रिगेड, छावा यांच्यासह इतर मराठा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना या बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले आहे.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मराठा समाज काहीसा शांत होता. पण आता मराठा समाजाच्या विविध संघटनांनी पुन्हा आवाज उठविण्यास प्रारंभ केला आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनाने दाखल केलेल्या आणि प्रलंबित असलेल्या पुनर्विचार याचिकेकडे लक्ष वेधले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने गायकवाड आयोगाच्या शिफारशी फेटाळल्यानंतर त्यात दुरूस्ती करून पुन्हा सादर करण्यासाठी राज्यशासनाने न्यायमूर्ती भोसले समिती नेमली होती. या समितीने त्रुटी दुरूस्त करून अहवाल दिला आहे. तो संपूर्ण माहितीसह पुनर्विचार याचिकेच्या सुनावणीवेळी सादर करावा लागणार आहे. तो सादर करावा, त्याचवेळी राज्य मागासवर्ग आयोगाचे पुनर्गठण करावे, दोन्ही प्रक्रिया एकाचवेळी सुरू कराव्यात, अशी संभाजीराजे यांची मागणी आहे. तर काहीं मराठा संघटनांनी 50 टक्क्यांच्या आत ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण द्यावे, असा आग्रह धरला आहे. या पार्श्वभूमीवर गुरूवारी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणारी बैठक महत्वपूर्ण ठरणार आहे. राज्य शासन या बैठकीनंतर कोणते पाऊल उचलते? याकडेही राज्यातील मराठा समाजाचे लक्ष असणार आहे.
Kolhapur; Important meeting tomorrow on ‘Sahyadri’ regarding Maratha community issues