फेक न्यूज अन् वातावरण बिघडविण्याचा आरोप ः 1.30 कोटी ह्यूज
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या इनपुटच्या आधारावर सरकारने युटय़ूबला 10 युटय़ूब चॅनेल्सच्या 45 व्हिडिओंना ब्लॉक करण्याचा निर्देश दिला आहे. माहिती-प्रसारण मंत्रालयानुसार हे व्हिडिओ फेक न्यूज (खोटे वृत्त) फैलावून शेजारी देशांसोबतचे संबंध बिघडवत होते. राष्ट्रहिताकरता युटय़ूब चॅनेल्सवर कारवाई करण्यात आली असल्याचे माहिती-प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी ट्विट करत सांगितले आहे.
या व्हिडिओंना 1.30 कोटीपेक्षा अधिक वेळा पाहिले गेले आहे. सरकारने काही समुदायांचे धार्मिक अधिकार हिरावून घेतल्याचा दावा या व्हिडिओंमध्ये करण्यात आला होता. या व्हिडिओंमुळे समुदायांदरम्यान भय आणि चुकीची धारणा फैलावत होती असे अधिकृत वक्तव्यात नमूद करण्यात आले आहे.
याचबरोबर या व्हिडिओंचा वापर अग्निपथ योजना, भारतीय सैन्य, भारताची राष्ट्रीय सुरक्षा व्यवसथा, काश्मीरशी निगडित मुद्दय़ांवर दुष्प्रचार करण्यासाठी केला जात होता. काही व्हिडिओंमध्ये जम्मू-काश्मीर तसेच लडाखच्या काही हिस्स्यांना भारताबाहेर दर्शविण्यात आले होते. या व्हिडिओंना आयटी ऍक्ट 2021 अंतर्गत ब्लॉक करण्यात आले आहे.
यापूर्वी ऑगस्ट महिन्यात माहिती-प्रसारण मंत्रालयाने राष्ट्रीय सुरक्षा, विदेश संबंध आणि सार्वजनिक व्यवस्थेबद्दल दुष्प्रचार करणाऱया 8 युटय़ूब चॅनेल्सना ब्लॉक करविले होते. यात 7 भारतीय आणि एक पाकिस्तानी युटय़ूब न्यूज चॅनेल सामील होते. ब्लॉक करण्यात आलेल्या युटय़ूब चॅनेल्सना 114 कोटीपेक्षा अधिक वेळा पाहिले गेले होते.