वृत्तसंस्था /सिल्हेत
गुरुवारी येथील सिल्हेत आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या महिलांच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत नाथकन चांथमच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर थायलंडच्या महिला संघाने पाकचा 4 गडय़ांनी पराभव करीत ऐतिहासिक विजय नोंदवला. चांथमला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा बहुमान मिळाला.
गुरुवारच्या सामन्यातील विजयामुळे थायलंडने स्पर्धेच्या गुणतक्त्यात पाचवे स्थान मिळविले आहे. तीन सामन्यातून त्यांनी दोन गुण नोंदविले असून तीनपैकी एक सामना त्यांनी जिंकला आहे. पाकचा संघ तीन सामन्यातून 4 गुणांसह दुसऱया स्थानावर आहे. पाक संघाने आतापर्यंत दोन सामने जिंकले आहेत.
गुरुवारच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाक संघाने 20 षटकात 5 बाद 116 धावा जमविल्या. त्यानंतर थायलंडने 19.5 षटकात 6 बाद 117 धावा जमवित हा सामना एक चेंडू बाकी ठेवून 4 गडय़ांनी जिंकला.
नाणेफेक जिंकून पाकने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकच्या डावामध्ये सिद्रा अमीनने 64 चेंडूत 6 चौकारांसह 56, मुनीबा अलीने 14 चेंडूत 2 चौकारांसह 15, निदा दारने 22 चेंडूत 12 तर अलीया रियाजने 1 चौकारासह नाबाद 10 धावा जमविल्या. कर्णधार महारुफ 3 धावांवर धावचीत झाली. आयेशा नसीमने 1 षटकारासह 8 धावा केल्या. पाकच्या डावामध्ये 1 षटकार आणि 9 चौकार नोंदविले गेले. थायलंडतर्फे एस. टिपॉचने 20 धावात 2 तर पी. थिपेटीचाने 21 धावात 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना थायलंडच्या डावामध्ये सलामीच्या के.ननापतने 24 चेंडूत 1 चौकारासह 13, नथाकन चांथमने 51 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारांसह 61, कर्णधार चेवाईने 1 चौकारासह 17 धावा जमविल्या. थायलंडच्या डावामध्ये 2 षटकार आणि 8 चौकार नोंदविले गेले. पाकतर्फे निदा दारने 26 धावात 2, तुबा हसनने 18 धावात 2 तसेच एन. संधू आणि इम्तियाज यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
पाक 20 षटकात 5 बाद 116 (सिद्रा अमीन 56, मुनीबा अली 15, निदा दार 12, अलीया रियाज नाबाद 10, टिपॉच 2-20, पी. थिपेटीचा 1-21), थायलंड 19.5 षटकात 6 बाद 117 (चांथम 61, के.ननापत 13, चेवाई 17, निदा दार 2-26, तुबा हसन 2-18, संधू 1-17, इम्तियाज 1-11).