ऑनलाईन टीम/तरुण भारत
अंधेरी पूर्व विधानसभा (Andheri East Bypoll Election) मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसपाठोपाठ काँग्रेसनेही शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. या निवडणुकीत काँग्रेस आपला उमेदवार उभा करणार नसून महाविकास आघाडी म्हणून शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देणार आहे, अशी घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गुरुवारी (दि. ६) केली. पण अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेला (Shivsena) पाठिंबा देण्यावरुन कॉंग्रेसमध्ये (Congress) अंतर्गत मतभेद असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, कॉंग्रेसनं अंधेरी पोटनिवडणुकीकरता शिवसेनेला पाठींबा जाहीर केला असला तरी मुंबईतील काही कॉंग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. काँग्रेसची स्वतःची एक वोट बँक असताना हा निर्णय कशासाठी. तसेच अंधेरी पोटनिवडणुकीत कॉंग्रेसची वोटबॅंक शिवसेनेकडे वळली तर आगामी बीएमसी निवडणूकीत फटका बसण्याची भीती काँग्रेस नेत्यांना वाटत आहे. त्यामुळे काँग्रेसच्या काही नेत्यांमध्ये नाराजी आहे. तर काँग्रेस अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेला मदत करणार असली तर आगामी बीएमसी निवडणुकीत शिवसेना कॉंग्रेसला मदत करणार का असाही सवाल कॉंग्रेस नेत्यांनी उपस्थित केला आहे. काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिलेला असतांना मुंबई महानगरपलिका निवडणुकीअगोदर काँग्रेसला वोट बॅंक मजबूत करण्याची संधी असतांना शिवसेनेला मदत का? असाही प्रश्न काही नेत्यांनी उपस्थित केला आहे.
हे ही वाचा : ‘धनुष्यबाण’ चिन्ह आम्हाला द्या, अन्यथा गोठवा; शिंदेंची निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे मागणी
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपने या आधीच मुरजी पटेल यांची उमेदवारी घोषित केली आहे. त्यामुळे या निवडणुकीत चांगलीच चुरस पाहायला मिळणार असून या निमित्ताने शिवसेना आणि शिंदे-भाजप गट पहिल्यांदाच समोरासमोर येणार आहेत. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात 3 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून ६ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. राज्याच्या राजकारणात बदललेल्या समीकरणांमुळे ही निवडणुक चुरशीची होणार आहे. शिवाय शिवसेनेचा निवडणूक चिन्ह कोणाला मिळतं याचीही उत्सुकता आहे.