श्रीस्थळच्या श्री मल्लिकार्जुन देवस्थान समितीचे स्पष्टीकरण : बदनाम करण्याचे षड्यंत्र असल्याचा आरोप
प्रतिनिधी /काणकोण
गोवा तसेच महाराष्ट्रात आदरणीय असलेले ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सोमनाथ कोमरपंत यांच्याविषयी काणकोणवासियांना आदर आहे. डॉ. कोमरपंत यांचे कुटुंब श्री मल्लिकार्जुन देवस्थानचे कूळ किंवा सेवेकरी नाही. देवस्थानच्या जमिनीत त्यांच्या नावावर दोन घरे आहेत. त्यामुळे श्री मल्लिकार्जुन देवस्थान समितीने त्यांचा छळ चालविला आहे अशा प्रकारची पत्रके समाजमाध्यमावर टाकून देवस्थान आणि समितीला बदनाम करण्याचे षड्यंत्र श्री मल्लिकार्जुन देवस्थानच्याच दोन महाजनांनी चालविले आहे. या व्यक्तींचा डॉ. कोमरपंत यांची घरांसहित जमीन हडप करण्याचा डाव असावा, असा आरोप श्रीस्थळ येथील श्री मल्लिकार्जुन देवस्थान समितीचे अध्यक्ष विठोबा देसाई यांनी देवस्थानच्या चावडीवरील कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.
देवस्थानचे मुखत्यार प्रमोद गावकर, खजिनदार सचिन देसाई, माजी अध्यक्ष राजेंद्र देसाई आणि अनिल न्गावकर उपस्थित होते.
आपल्या समितीने सहा महिन्यांपूर्वी देवस्थानचा ताबा घेतला. या देवस्थानच्या गोव्यातील काणकोण, फोंडा तसेच कर्नाटकातील काही भागांत लाखो चौ. मी. इतक्या जमिनी आहेत. त्यातील बऱयाच जमिनी सेवेकरी, कूळ, महाजन यांच्याकडे असून काही ठिकाणच्या कित्येक लाख चौ. मी. जमिनी लागवड न केल्यामुळे पडीक अवस्थेत आहेत. या जमिनी ताब्यात घेऊन लावगडीखाली आण्याव्यात आणि देवस्थानचा महसूल वाढविण्याकडे नवीन समितीने लक्ष द्यावे असा निर्णय महाजनी बैठकीत घेण्यात आला होता. त्यानुसार मोखर्ड, भाटपाल, देवाबाग या ठिकाणची मिळून 1 लाख 75 हजार चौ. मी. जमीन देवस्थान समितीने आतापर्यंत ताब्यात घेऊन तेथे कवाथे तसेच आंब्याच्या कलमांची लागवड केली आहे. काही वर्षांत या ठिकाणी बऱयापैकी आमराई झालेली पाहायला मिळेल, अशी माहिती देसाई यांनी दिली.
पाळोळे येथील सर्व्हे क्र. 116/2 या 7500 चौ. मी. इतक्या देवस्थानच्या मालकीच्या आणि माडेलीबाग म्हणून ओळखण्यात येणाऱया जमिनीत एकूण 16 जणांनी सध्या घरे बांधलेली आहेत. त्या ठिकाणी डॉ. कोमरपंत यांच्या नावे दोन घरे आहेत. घर व सभोवतालची जागा सोडून जी जागा राखीव आहे ती जागा देवस्थानने ताब्यात घेण्याचे ठरवून मापणी केली होती. त्यावेळी या ठिकाणी राहत असलेल्या कोणीही आडकाठी केली नाही. निवासी घरांबरोबरच या जमिनीवर व्यावसायिक व्यवहार चालू आहेत. कोणी शॅक्स, तर कोणी तंबू घातलेले आहेत. त्यांच्या व्यवसायांना देवस्थानने बंदी केलेली नाही, असे देसाई यांनी नजरेस आणून दिले.
पायवाट वा घरासमोरील जागा अडविलेली नाही
उलट दरवर्षी देवस्थानने ठरविल्याप्रमाणे हे लोक फी द्यायला राजी झाले आहेत. डॉ. कोमरपंत यांची पायवाट किंवा घरासमोरची मंडपाची जागा देवस्थानने अडविलेली नाही. त्यांनी देखील आपल्या घर आणि सभोवतालची 300 चौ. मी. जागा सोडून उर्वरित 300 मीटर इतकी जमीन विकत देण्याची विनंती देवस्थानकडे केली होती. परंतु देवस्थान कायद्यानुसार देवस्थानच्या जमिनी विकता येत नाहीत. या भागातील जमिनींचा सध्या भाव वाढलेला आहे. त्यानुसार देवस्थानने देखील कसलेही पक्के बांधकाम न करता व्यावसायिक व्यवहारांसाठी शिल्लक असलेली जमीन ताब्यात घेऊन देवस्थानचे उत्पन्न वाढविण्याचा विचार करत कामाला प्रारंभ केला आहे. या कामात डॉ. कोमरपंत यांनी आडकाठी आणलेली नाही किंवा त्यांच्या वारसदारांनी देखील हस्तक्षेप केलेला नाही, असे देसाई म्हणाले.
विनाकारण बदनामीचा प्रयत्न
मात्र देवस्थानचे महाजन असलेल्या डॉ. प्रवीण गावकर आणि संदीप गावकर यांनी विनाकारण प्रकरण चिघळवून समितीला बदनाम करण्याचा जणू विडाच उचलला आहे,, असा दावा देसाई यांनी केला. काणकोण तालुक्यात विविध ठिकाणी बेकायदेशीर बांधकामे चालू आहेत. त्याकडे दुर्लक्ष करून संदीप गावकर यांना हेच बांधकाम कसे दिसले, असा सवाल त्यांनी केला. यासंबंधी 30 रोजी चर्चा करण्यासाठी विशेष महाजनी सभा बोलाविण्यात आली असता या दोन्ही व्यक्ती त्याला अनुपस्थित राहिल्या. देवस्थानचे कूळ, सेवेकरी त्याचप्रमाणे काही महाजनांकडे असलेल्या आणि सध्या विनावापर पडून असलेल्या जमिनी ताब्यात घेण्याच्या निर्णयाचे महाजनांनी देखील स्वागत करून संपूर्ण पाठिंबा दर्शविला आहे. येणाऱया काळात ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे देसाई यांनी स्पष्ट केले. डॉ. कोमरपंत यांच्या घराचे वारसास्थळ म्हणून जतन करण्याचा जो एक विचार डॉ. प्रवीण गावकर यांनी पुढे आणला आहे त्याचे देवस्थान समितीने निश्चित स्वागत केले असते. सध्या समाजमाध्यमांवर देवस्थान आणि समितीची बदनामी चालू आहे. त्यामुळे सत्य आणि दुसरी बाजू समोर यावी म्हणून ही पत्रकार परिषद घेतलेली आहे, असे अध्यक्ष देसाई यांनी स्पष्ट केले.