विजय सरदेसाई यांचा सवाल : अन्यथा कर्नाटकने सुरू केलेले काम बंद करा
प्रतिनिधी /मडगाव
कर्नाटकने म्हादई खोऱयात पाणी वळविण्यासाठी यंत्रसामग्री आणून ठेवली असून त्यांनी कामही सुरू केले आहे अशा आशयाचे वृत्त वृत्तपत्रात प्रसिद्ध होऊनही गोवा सरकारने त्यावर अजून कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही यावर गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आपल्या राजकीय स्वार्थासाठी व आपली खुर्ची सांभाळण्यासाठी म्हादई कर्नाटकला विकली का, असा सवाल त्यांनी केला आहे.
यापूर्वी म्हादई नदीत कर्नाटक बंधारा बांधून पाणी वळवू पाहत आहे याकडे पर्यावरणवादी कार्यकर्ते राजेंद्र केरकर यांनी लक्ष वेधले होते. त्यावेळी मुख्यमंत्री सावंत यांनी आपण स्वतः परिस्थितीचा आढावा घेऊ असे म्हटले होते. पण मागच्या तीन महिन्यांत ते तिथे फिरकलेलेच नाहीत. गोवा सरकारने कर्नाटक राज्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जी अवमान याचिका दाखल केली आहे असे सांगण्यात येते ती याचिकाही अजून सुनावणीस आलेली नाही. गोवा सरकारला म्हादईचे काहीच पडून गेलेले नाही असा अर्थ यातून काढायचा का, असा सवाल सरदेसाई यांनी केला आहे. ़
म्हादई ही गोव्याची जीवनदायिनी आहे. पण गोवा सरकारला तिचे काहीच पडून गेलेले नाही. सावंत यांना म्हादई खरीच आपली आई वाटत असेल, तर त्यांनी पोलिसांचा लावजमा घेऊन संपूर्ण गोव्यात फिरण्याऐवजी जिथे काम चालू आहे तिथे स्वतः जाऊन पाहणी करावी आणि हे चालू झालेले काम बंद पाडावे अन्यथा आपण कर्नाटकशी म्हादईचा सौदा केला आहे हे जाहीर करावे, असे आव्हान सरदेसाई यांनी दिले आहे.