यू-19 महिला टी-20 मालिका ः श्वेता, सौम्या, अर्चना, शबनम यांची चमक
वृत्तसंस्था/ प्रिटोरिया
दक्षिण आफ्रिका दौऱयावर असणाऱया भारताच्या यू-19 टी-20 महिला संघाने दौऱयाची विजयी सुरुवात करताना येथे झालेल्या पहिल्या सामन्यात अष्टपैलू प्रदर्शन करीत यजमान द.आफ्रिकेवर 54 धावांनी विजय मिळवित 1-0 अशी आघाडी घेतली. या मालिकेत एकूण पाच सामने होणार आहेत.
पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेतच आयसीसी यू-19 महिला टी-20 विश्वचषक स्पर्धा होणार असून त्याच्या तयारीच्या दृष्टीने ही मालिका दोन्ही संघांसाठी उपयुक्त ठरणार आहे. यू-19 टी-20 विश्वचषक स्पर्धा 14 ते 29 जानेवारी या कालावधीत होणार आहे. येथील सामन्यात प्रथम फलंदाजी मिळाल्यावर भारतीय महिलांनी 20 षटकांत 5 बाद 137 धावा जमविल्या. सलामीवीर श्वेता सेहरावत व सौम्या तिवारी यांनी 40 व 36 धावा काढल्या. श्वेताने 39 तर सौम्याने 46 चेंडूत या धावा जमविल्या. मात्र भारताची सुरुवात निराशाजनक झाली. कर्णधार शेफाली वर्मा पहिल्याच चेंडूवर बाद झाली होती. श्वेता व सौम्या यांनी डाव सावरताना दुसऱया गडय़ासाठी 74 चेंडूत 70 धावांची भागीदारी केली. श्वेताने आपल्या खेळीत 5 चौकार मारले तर सौम्या तिवारीने 3 चौकार व एक षटकार मारला. या दोघींव्यतिरिक्त रिचा घोषने 15, तितास संधूने नाबाद 13 व हर्ली गालाने नाबाद 11 धावा करीत उपयुक्त योगदान दिले. द.आफ्रिकेच्या कायला रेनेके (2-13) व अयांदा हलुबी (2-22) यांनी प्रत्येकी 2 बळी मिळविले.
या माफक धावसंख्येचे रक्षण करताना भारताची मध्यमगती गोलंदाज शबनम शकील (15 धावांत 3 बळी) व अन्य गोलंदाजांनी भेदक मारा केल्याने द.आफ्रिकेचे गडी ठरावीक अंतराने बाद होत गेले. भारताने त्यांना निर्धारित षटकांत 8 बाद 83 धावांवर रोखत आरामात विजय मिळविला. शबनमने पहिल्या दोन षटकांतच यजमानांची स्थिती 2 बाद 10 अशी केली होती. ऑफस्पिनर अर्चना देवीने मधल्या षटकांत उत्तम गोलंदाजी करीत 14 धावांत 3 बळी टिपले तर हर्ली गाला व सोनम यादव यांनी प्रत्येकी एक बळी मिळविला. द.आफ्रिकेच्या फक्त तीन महिलांना, कायला रेनेके (20), मॅडिसन लँड्समन (10) व जेमा बोथा (नाबाद 10), दुहेरी धावसंख्या गाठता आली. या मालिकेतील दुसरा सामना गुरुवारी खेळविला जाईल.
संक्षिप्त धावफलक ः भारतीय महिला 20 षटकांत 5 बाद 137 ः श्वेता सेहरावत 40, सौम्या तिवारी 36, कायला रेनेके 2-13, अयांदा हलुबी 2-22. द.आफ्रिका महिला 20 षटकांत 8 बाद 83 ः रेनेके 20, बोथा नाबाद 10, अर्चना देवी 3-14, शबनम शकील 3-15.