10 ट्रिलियन डॉलरवर झेप घेणार ः सेंटर फॉर इकॉनॉमिक्स अँड बिझनेस रिसर्चचा अहवाल
नवी दिल्ली
अर्थव्यवस्थेच्या निरंतर वाढीमुळे 2037 पर्यंत भारत आर्थिक लीग टेबलमध्ये तिसऱया स्थानावर पोहोचेल. 2022 मध्ये भारत सध्या पाचव्या स्थानावर आहे. यासह, 2037 मध्ये, भारत 10 ट्रिलियन डॉलरचा आकडा गाठून जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार असल्याचे संकेत सेंटर फॉर इकॉनॉमिक्स अँड बिझनेस रिसर्च (सीईबीआर) यांच्या अहवालामधून देण्यात आले आहेत.
सीईबीआर यांनी जाहीर केलेल्या वार्षिक वर्ल्ड इकॉनॉमिक लीग टेबल 2023 मध्ये असे म्हटले आहे, की भारतीय अर्थव्यवस्था पुढील पाच वर्षांत सरासरी 6.4 टक्के दराने वाढेल. त्यानंतर पुढील नऊ वर्षांचा सरासरी दर 6.5 टक्के राहणार असल्याचेही यावेळी सांगितले आहे. 2022 मध्ये आर्थिक लीग टेबलमध्ये पाचव्या स्थानावर राहिल्यानंतर भारत 2037 मध्ये तिसऱया क्रमांकावर पोहोचू शकेल तर चीन जगात पहिल्या क्रमांकावर असेल आणि अमेरिका दुसऱया क्रमांकावर राहणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.
देशाच्या अर्थव्यवस्थेमधील विविधता
सीईबीआरने सांगितले की, देशातील बहुतांश आर्थिक उलाढाली सेवा क्षेत्राशी जोडलेल्या आहेत. गेल्या काही वर्षात देशाच्या अर्थव्यवस्थेत विकासाबरोबर वैविध्य आल्याने हे घडले आहे. तथापि, देशाच्या श्रमशक्तीचा मोठा वाटा अजूनही शेतीमध्ये कार्यरत आहे त्याचाही हातभार अर्थव्यवस्थेला मिळत असल्याचे म्हटले आहे.
कोरोनामुळे नुकसान
संशोधन संस्थेने म्हटले आहे की, कोरोना महामारीचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम झाला आहे. 2020-21 मध्ये उत्पादन 6.60 टक्क्यांपेक्षा कमी होते.
भारत जगातील सर्वात वेगवान अर्थव्यवस्था
सीईबीआरने आपल्या अहवालात म्हटले आहे की, कोरोनाचा झटका सहन केल्यानंतर भारताने आर्थिकबाबतीत कमालीची वाढ पाहिली आहे, मजबूत देशांतर्गत मागणीमुळे हे शक्य झाले आहे. म्हणूनच 2021-22 या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था 8.7 टक्के दराने वाढली, जी जगातील सर्वाधिक आहे.