रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची माहिती ः गर्भगृहाचे खांब 14 फुटांपर्यंत सज्ज
अयोध्या / वृत्तसंस्था
श्री रामजन्मभूमीतील राम मंदिराचे 60 टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. गर्भगृहाचे खांब 14 फुटांपर्यंत पूर्ण झाले आहेत. मंदिराची उभारणी सध्या वेगाने होत आहे. मंदिराचे बांधकाम तीन टप्प्यात पूर्ण होणार आहे. पहिला टप्पा ऑगस्ट 2023 पर्यंत, तर दुसरा टप्पा डिसेंबर 2024 मध्ये पूर्ण होईल. त्यानंतर 2025 पर्यंत मंदिर पूर्णपणे आकारास येणार आहे. तत्पूर्वी जानेवारी 2024 मध्ये मंदिरात दर्शन-पूजेला सुरुवात होणार आहे.
श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने प्रसारमाध्यमांद्वारे राम मंदिराच्या उभारणीच्या प्रगतीची माहिती जारी केली आहे. राम मंदिराचे सुमारे 60 टक्के काम पूर्ण झाले आहे. तसेच आतापासून ठीक एक वर्षाने म्हणजे 2024 च्या मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान रामाच्या बाल स्वरुपातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार असल्याची माहिती ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी दिली. मंदिराच्या उभारणीसाठी आतापर्यंत सुमारे 800 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. एकूण खर्च अंदाजे 1,800 कोटी रुपये आहे.
पुढील मकरसंक्रांतीला मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना
मंदिराचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू आहे. मंदिराच्या पहिल्या मजल्याचे बांधकाम ऑक्टोबर 2023 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. तसेच 2024 च्या मकर संक्रांतीपर्यंत, मंदिराच्या गर्भगृहात भगवान रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होईल. आतापर्यंत केलेल्या नियोजनानुसार 1 जानेवारी ते 14 जानेवारीदरम्यान प्राणप्रति÷sचे काम करण्याचे नियोजन असल्याचे सांगण्यात आले. हे भव्य मंदिर नियोजित कालमर्यादेपूर्वी तयार होईल. मंदिराच्या उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. मात्र, जानेवारी 2024 मध्ये मंदिराच्या गर्भगृहाचे काम पूर्ण होऊन देवतेची प्रति÷ापना केली जाणार आहे. रामलल्लाची मूर्ती 5 ते 7 वयोगटातील ‘बाल’ स्वरुपात असेल, असे सांगण्यात आले.
कर्नाटक, ओडिशातील शिल्पकारांकडे मूर्तीकामाची जबाबदारी
भगवान श्रीरामाची मूर्ती साडेआठ फूट उंच असून ती तयार करण्यासाठी 5 ते 6 महिने लागतील. या मूर्तीसाठी आकाशी रंगाचा दगड वापरला जाणार असून महाराष्ट्र आणि ओडिशा येथील शिल्पकला अभ्यासकांनी असा दगड आपल्याकडे उपलब्ध असल्याची ग्वाही दिली आहे. पद्मश्री पुरस्कारप्राप्त शिल्पकार रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिमा बनवणार आहेत. ओडिशातील ज्ये÷ शिल्पकार सुदर्शन साहू व वासुदेव कामत यांच्यासह कर्नाटकातील रमैय्या वाडेकर यांचा या कामात सहभाग असणार आहे. ट्रस्टने या मूर्तीकारांना मूर्तीचा आराखडा तयार करण्यास सांगितले आहे.