बेळगाव : कॅन्टोन्मेंटच्या लोकनियुक्त सभागृहाची मुदत संपून 2 वर्षे झाली. मात्र अद्यापही कॅन्टोन्मेंट निवडणूक घेतली नाही. कॅन्टोन्मेंटची नागरी वसाहत महापालिकेत समावेश करण्याचा रस्ता तयार करण्यात आला आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेंटवर प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासकीय राजवटीला आणखीन 6 महिन्याचा कालावधी वाढवून दिला आहे. संरक्षण खात्याने याबाबतची आधिसूचना जारी करून बेळगाव
कॅन्टोन्मेंटच्या प्रशासकीय राजवटीला मुदतवाढ देण्यात आल्याचे प्रसिद्ध केले आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डच्या लोकनियुक्त सभागृहाची मुदत 4 वर्षापूर्वी संपुष्टात आली होती. मात्र लोकनियुक्त सदस्यांना दोन वर्षाचा वाढीव कालावधी देण्यात आला. त्यानंतर दि. 11 फेब्रुवारी 2021 रोजी लोकनियुक्त सभागृह बरखास्त करून कॅन्टोन्मेंट बोर्डवर प्रशासकीय राजवट लागू केली. प्रशासकीय राजवटीत अध्यक्षपदाची धुरा स्टेशन कमांडंट यांच्याकडे असते. कमिटीच्या सचिवपदाची जबाबदारी कॅन्टोन्मेंट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे दिली जाते. तसेच जनतेमधून सरकारनियुक्त सदस्यांची नियुक्ती करण्यात येते. यापूर्वी सुधीर तुपेकर यांची सरकार नियुक्त सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. दि. 10 फेब्रुवारी रोजी सरकार नियुक्त समितीची मुदत संपणार आहे. त्यामुळे सदर समितीला मुदतवाढ देण्याचा निर्णय संरक्षण खात्याने घेतला आहे. अद्याप कॅन्टोन्मेंट निवडणूक घेण्याच्या दृष्टीने कोणत्याच हालचाली नाहीत. तसेच नागरी वसाहतीचा भाग महापालिकेत समाविष्ठ करण्याचा प्रस्ताव तयार करून महापालिकेला पाठविण्यात आला आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेंट निवडणुका होण्याची शक्यता धुसर बनली आहे. विद्यमान समितीला मुदतवाढीचा निर्णय संरक्षण खात्याने घेतला आहे. अध्यक्ष, सेक्रेटरी आणि सरकार नियुक्त सदस्य सुधीर तुपेकर यांना आणखीन 6 महिन्याची वाढीव मुदत देण्यात आल्याची अधिसूचना जारी केली आहे. पुढील 6 महिने किंवा निवडणुकीची घोषणा होईपर्यंत या पदावर कार्यरत राहतील असे पत्र संरक्षण खात्याने जारी केले आहे.