वार्ताहर/ कराड
कोल्हापूर नाक्यावरील उड्डाणपूल पाडण्याचे काम प्रगतीपथावर असून आतापर्यंत एकूण आठ पिलर जमीनदोस्त करण्यात आले आहेत. यातील कमी उंचीचे पूल पोकलेन मशिनच्या साहाय्याने पाडण्यात येत आहेत. तर उंचीने जास्त असलेले पिलर डायमंड कटर मशिनच्या साहाय्याने कापण्यात आले आहेत. डायमंट कटर मशिन आकाराने अत्यंत लहान हायड्रोलिक मशिन आहे. मात्र मोठ मोठे पिलर सहजपणे कापत आहे.
आशियाई महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम अत्यंत वेगाते सुरू आहे. याच कामांतर्गत कोल्हापूर नाका ते मलकापूर दरम्यान नवीन उड्डाण पूल बांधण्यात येणार आहे. त्यासाठी सातारा-कोल्हापूर लेनवर कोल्हापूर नाका येथे असलेला उड्डाणपूल पाडण्याचे काम सध्या सुरू आहे. तर मलकापूर येथील कृष्णा हॉस्पिटल समोर उड्डाणपूल पाडण्याची तयारी करण्यात आली आहे. 18 दिवसांच्या काळात उड्डाणपुलाचा बहुतांश भाग पाडण्यात आला आहे. तर पुलासाठी उभारलेले पिलर पाडण्याचे काम सध्या सुरू आहे.
कोल्हापूर नाका येथे पुलाखालुन शहरात ये-जा करण्यासाठी रस्ता असल्याने याठिकाणी सर्वात उंच पिलर उभारण्यात आले होते. तर कोल्हापूर नाक्यापासून पंकज हॉटेल व पादचारी पुलाकडे उतरता उ•ाणपूल असल्याने दोन्ही बाजूला कमी उंचीचे पिलर उभारण्यात आले होते. कमी उंचीचे पिलर पाडण्यासाठी पोकलेन मशिनचा वापर करण्यात येत आहे. एकाचवेळी दोन ते तीन पोकलेन व ब्रेकर मशिनच्या साहाय्याने पिलर जमीनदोस्त करण्यात येत आहेत. आतापर्यंत पाच कमी उंचीचे पिलर पाडण्यात आले आहेत.
कोल्हापूर नाका येथे मात्र सर्वात उंच पिलर आहेत. पोकलेन मशिनच्या साहाय्याने हे पिलर पाडणे शक्य नसल्याने, यासाठी डायमंड कटर मशिन वापरण्यात आले आहे. हे मशिन आकाराने अत्यंत लहान असून रोबोटप्रमाणे काम करीत आहे. इलेक्ट्रीक सप्लायवर चालणारे हे हायड्रोलिक मशिन आहे. हे मशिन पूर्णपणे रिमोट कंट्रोलवर चालवण्यात येत आहे. 2 मिटर व्यासाचा पिलर तळातून कापण्याचे काम या मशिनच्या माध्यमातून करण्यात येत आहे. पिलर कापल्यानंतर दोन पोकलेन मशिनच्या सहाय्याने पिलर पाडण्यात येत आहे. आतापर्यंत तीन उंच पिलर पाडण्यात आले आहेत. उड्डाण पूल पाडण्याचे काम प्रगतीपथावर असून लवकरच कृष्णा हॉस्पिटल समोरील पूल पाडण्याचे काम सुरू होणार आहे.