सरकारी कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन
बेळगाव ; राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत आंदोलन पुकारल्याने बुधवारी सरकारी व अनुदानित शाळा बंद ठेवण्यात आल्या. परंतु बऱ्याचशा पालकांना शाळा बंद असल्याची माहिती वेळेत मिळाली नाही. त्यामुळे विद्यार्थी व पालकांना शाळेपर्यंत येवून पुन्हा माघारी फिरावे लागले. यामुळे पालकांची तारांबळ उडाली. सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, या मागणीसाठी बेमुदत आंदोलन छेडण्यात आले. यामध्ये सरकारी व अनुदानित शाळांचे शिक्षक सहभागी झाले. काही दिवसांपूर्वी शिक्षक संघटनांनीही या संपाला पाठिंबा दिला होता. सरकारी कर्मचारी संघटनांची राज्य सरकारसोबत चर्चा सुरू असल्याने संप मिटणार की वाढणार, हे कोणालाच माहीत नव्हते. मंगळवारी सायंकाळी शाळा सुटण्यापूर्वी सर्व विद्यार्थ्यांना सूचना करण्यात आल्या होत्या. बुधवारी फोन करूनच शाळेत दाखल व्हा, असे सांगण्यात आले होते. नेहमीप्रमाणे पालक आपल्या विद्यार्थ्यांना घेऊन बुधवारी सकाळी शाळेत दाखल झाले. परंतु शाळा बंद असल्याने त्यांना माघारी फिरावे लागले. गुरुवार दि. 2 पासून सुरळीतपणे शाळा सुरू राहतील, असे सांगण्यात आले आहे.