महाबळेश्वर / प्रतिनिधी :
महाबळेश्वर तालुक्यातील 45 अनधिकृत बांधकामांना 24 तासात इमारत खाली करण्याची नोटीस देण्यात आली आहे. 24 तासाच्या आत घरातील साहित्य स्वतःहून बाहेर काढा, त्याचबरोबर आतील मौल्यवान वस्तू अथवा जे काही महत्त्वाच्या वस्तू असतील त्या बाहेर काढा; अन्यथा घरातल्या आतील साहित्यासह इमारत सील करण्यात येईल, असे या नोटीसमध्ये म्हटले आहे. दांडेकर, तळेमाळ, पाचगणी, भिलार, पांगरी, खिंगर आदी परिसरातील डोंगरी पट्टय़ातील अनधिकृत बांधकामांना ही नोटीस दिल्याने बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी व डोंगर माथ्यावरील असणाऱ्या शहरासह इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये व शेतजमिनीवर अनाधिकृत मोठमोठाल्या बंगले इमारती हॉटेल्स रिसॉर्ट बांधून मोठय़ा प्रमाणात निसर्गाची हानी केली आहे. यावरूनच जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत कडक पावले उचलली असून, महाबळेश्वर महसूल विभागासह पंचायत समिती वीज वितरण कंपनी पोलीस यंत्रणा नगरपालिका या सर्वांनाच त्यांच्या कार्यक्षेत्राच्या अतिर्यात येणाऱ्या सर्व अनाधिकृत बांधकामांना सरसकट नोटीसा धाडण्यास सांगितले आहे. यावरूनच महाबळेश्वर महसूल विभागाने सतर्क होत एक भले मोठे पंचतारांकित रिसॉर्ट सील केले आहे तर 45 जणांना 24 तासाचा इशारा दिला आहे. या 24 तासाच्या नोटिसद्वारे स्वतःहून अनधिकृत केलेल्या बांधकामाच्या आतील गृहपयोगी साहित्य स्वतःहून बाहेर काढण्यासाठी संबंधित अनधिकृत बांधकाम करणाऱ्या मालकाला सांगितले आहे. अन्यथा घरातील साहित्यसह संबंधित इमारत सील करण्यात येईल, अशी नोटीस धाडली आहे. त्यामुळे 24 तासानंतर महाबळेश्वर तालुक्यातील 45 बांधकामे पूर्णतः सील होणार असल्याचे नायब तहसीलदार पारवे यांनी सांगितले आहे
नव्याने सुरू असणाऱया बांधकामांचे काय?
45 अनाधिकृत बांधकामांना नोटीसा दिल्या. मात्र, नव्याने सुरू असणाऱ्या बांधकामांचे काय? सध्या महाबळेश्वर तालुक्मयात तायघाट, भिलार, भोसे, पाचगणी परिसरातील तळेमाळ, खिंगर आदी परिसरात भली मोठी बांधकामे सुरू आहेत या अनधिकृत बांधकामाचे पंचनामे अद्यापही केले गेलेले नाहीत. कोणाच्या वरदहस्ताने ही बांधकामे सुरू आहेत, याबाबत देखील महाबळेश्वर महसूल विभागाने आत्ताच पावले उचलावी आणि पूर्ण बांधकाम होण्याच्या आधीच सध्याची सुरू असणारी बांधकाम सील करावी.