राहुल यांच्या अमेरिका दौऱ्यासंबंधीच्या प्रश्नावर प्रतिक्रिया
वृत्तसंस्था/ केपटाउन
राहुल गांधी हे अमेरिका दौऱ्यादरम्यान भाजप तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींसंबंधी एकामागोमाग एक वक्तव्ये करत आहेत. यासंबंधी विदेशमंत्री एस. जयशंकर यांना दक्षिण आफ्रिकेतील केपटाउनमध्ये प्रश्न विचारण्यात आला. मी कुणाच्या म्हणण्यासंबंधी सहमत नसू शकतो, परंतु याप्रकरणी मी विदेशातून राजकारण करणार नाही, भारतात परतल्यावरच स्वत:ची प्रतिक्रिया देईल असे जयशंकर यांनी म्हटले आहे.
ब्रिक्स देशांच्या बैठकीसाठी विदेशमंत्री दक्षिण आफ्रिकेत आहेत. यादरम्यान त्यांनी भारतीय वंशाच्या लोकांशी संवाद साधला. यावेळी एका युवकाने राहुल यांच्या अमेरिका दौऱ्याबद्दल प्रश्न विचारला होता. यावर मी विदेशात जाऊन राजकारण करत नसल्याचे जयशंकर यांनी म्हटले आहे.
विदेशात असेन तेव्हा राजकारण न करण्याचा माझा प्रयत्न असतो, परंतु भारतात चर्चा करण्याची माझी तयारी आहे. लोकशाहीत देखील सामूहिक जबाबदारी असते. राष्ट्रहित पाहिले जाते. काही गोष्टी राजकारणापेक्षाही महत्त्वाच्या असतात. जेव्हा आपण देशाबाहेर पाऊल ठेवतो, तेव्हा या गोष्टी विचारात घेतल्या जाव्यात असे उद्गार जयशंकर यांनी काढले आहेत.
पंतप्रधान मोदी सन्मानास पात्र
इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा हे राहुल यांच्या अमेरिका दौऱ्यात त्यांना साथ देत आहेत. पित्रोदा यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले आहे. पंतप्रधान मोदी हे सर्वठिकाणी सन्मान मिळविण्यास पात्र आहेत. मोदी हे माझेही पंतप्रधान आहेत असे वक्तव्य पित्रोदा यांनी केले आहे.