आरोग्यवर्धक काळ्या तांदळाविषयी उत्सुकता, लागवडीत होणार वाढ : स्थानिक पातळीवर बियाणांची कमतरता
बेळगाव : मान्सून तेंडावर आला असून पेरणी आणि मशागतीच्या कामांना जोर आला आहे. यंदादेखील पारंपरिक भात पेरणीबरोबर काळ्या भातांची पेरणी व लागवड होणार आहे. मागील दोन-चार वर्षात पारंपरिक भातपेरणीबरोबर काळ्या भाताची लागवड होऊ लागली आहे. प्रायोगिक तत्त्वावर काही शेतकऱ्यांनी या काळ्या भाताची लागवड केली आहे. हा प्रयोग यशस्वी होत असल्याने यंदाच्या हंगामात काळ्या भाताच्या लागवडीत वाढ होणार आहे. विशेषत: आरोग्यवर्धक या काळ्या तांदळाकडे शेतकऱ्यांचा कल वाढू लागला आहे. त्यामुळे खरीप हंगामात काळ्या भाताचे क्षेत्र वाढणार आहे. आरोग्याला उत्तम मानले जाणाऱ्या या काळ्या तांदळाविषयी शेतकऱ्यांमध्येदेखील प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र स्थानिक पातळीवर काळे भात बियाणे उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना ते बाहेरुन घ्यावे लागत आहे. विशेषत: या काळ्या भाताचा दर अधिक असल्याने शेतकऱ्यांनादेखील जादा पैसे मोजावे लागत आहेत. मागील दोन वर्षात हिंडलगा, जाफरवाडी, सांबरा, कणबर्गी आदी भागात काळ्या भाताची लागवड झाली होती. मात्र यंदा इतर ठिकाणीदेखील या काळ्या भाताची लागवड होणार आहे.
बियाणांचा दर अधिक
आजपर्यंत पांढरा तांदूळ सर्वांनी पाहिला आहे, आणि खाल्लादेखील आहे. मात्र काळा तांदूळ बहुतेकांनी खायचे तर लांबच, पाहिलादेखील नाही. त्यामुळे नागरिकांमध्येदेखील काळा तांदूळ कसा असतो. याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे. मात्र स्थानिक शिवारातच काळा भात लागवड केला जाणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागात काळा तांदूळ उपलब्ध होणार आहे. काळ्या भाताची बियाणाचा दर थोडा अधिक असतो. 600 ते 700 रुपये किलो दराने तो विकत घ्यावा लागतो. शेतकरी बासमती, इंद्रायणी, दोडगा, शुभांगी, सोनम, शुभम या जातीची बियाणे पेरतात. याबरोबर आता काळ्या तांदळाची पेरणी आणि लागवड होणार आहे.
रुग्णांच्या आहारात या तांदळाचा वापर
दोन वर्षापासून तालुक्यातील काही शेतकरी काळ्या भाताची लागवड करू लागले आहेत. विशेषत: हा तांदूळ काळा असतो. आरोग्याला उत्तम असल्याने बाजारात मागणीदेखील अधिक आहे. शुगर व रक्तदाब यासह इतर रुग्णांच्या आहारात या तांदळाचा वापर होतो.
– आर. बी. नायकर (तालुका कृषी अधिकारी)