गळती लगेच आटोक्यात, बंदरातील टाकी हटवण्याची आमदारांची मागणी
वास्को : मुरगांव बंदरात अमोनिया गॅस गळतीची घटना मंगळवारी दुपारी घडली. एमपीए व झुआरी कंपनीच्या अग्नीशामक दलानी लगेच या घटनेवर नियंत्रण मिळवल्याने गंभीर घटना टळली. मात्र, या घटनेमुळे मुरगाव बंदर व परीसरात भितीची छाया पसरली. मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी या घटनेची गंभीर दखल घेत बंदरातील अमोनियाची टाकी जनतेच्या सुरक्षेसाठी हटवण्याची मागणी केली आहे. मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास मुरगाव बंदरातील धक्का क्रमांक आठवर अमोनिया गळतीची घटना घडली. या धक्क्यावर नांगरण्यात आलेल्या एका जहाजातून अमोनिया गॅस खाली करण्यात येत होता. जहाजातून खाली करण्यात येणारा गॅस तेथील वाहिनीव्दारे थेट बंदरातील अमोनिया गॅस टाकीत भरण्यात येतो. त्यानंतर त्याची रस्तामार्गे झुआरी कंपनीसाठी वाहतुक करण्यात येते. ही नियमीत प्रक्रिया असते. मात्र मंगळवारी दुपारी जहाजातून अमोनिया खाली करण्यात येणाऱ्या वाहिनीतून अपघाती गळती सुरू झाली. गळती होत असल्याचे आढळून येताच जहाजावरील कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. अमोनिया खाली करण्याचे काम त्वरीत बंद करण्यात आले. मात्र, वाहिनीमध्ये असलेला वायू वातावरणात पसरू लागल्याने तो रोखण्याची आवश्यकता होती. त्यामुळे मुरगाव बंदर प्राधिकरण व झुआरी कंपनीच्या अग्नीशामक दलांना धाव घ्यावी लागली. पाण्याच्या फवाऱ्यांनी त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवले तसेच लगेच वाहिनीच्या दुरूस्तीचे कामही हाती घेतले. गॅस गळतीवर नियंत्रण ठेवण्यास यश आल्याने गंभीर प्रसंग टळला. वास्कोतील शासकीय अग्नीशामक दलाला या घटनेची माहिती दुपारी 12.10 वा. मिळाली. त्यांनीही त्वरीत घटनास्थळी धाव घेतली. मात्र, त्यापूर्वीच अमोनिया गॅस गळती थांबवण्यात यश आले होते. ही गॅस गळती छोटीशीच होती अशी माहिती अग्नीशामक दलाचे अधिकारी दिलीप बिचोलकर यांनी दिली.
अमोनिया गॅस टाकी मुरगाव बंदरातून हटवण्याची मागणी – आमदार संकल्प आमोणकर
दरम्यान, या घटनेचे वृत्त पसरताच मुरगाव बंदर व परीसरात भिती पसरली. मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांना या गळतीची माहिती मिळताच त्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची दखल घेऊन आमदार संकल्प आमोणकर यांनी मुरगाव बंदरातील आमोनियाची टाकी स्थानिक लोकांसाठी धोकादायक असून ती त्वरीत हटवण्यात यावी अशी मागणी केली आहे. या टाकीच्या असुरक्षेचा विषय आपली विधानसभेतही मांडलेला आहे. मुरगाव बंदरातील होणारी अमोनियाची हाताळणी आणि वाहतुक असुरक्षीत व बेकायदेशीर असल्याचा आरोप आमदार आमोणकर यांनी केला आहे. अमोनिया टाकी मुरगाव परीसरासाठी टाईम बॉम्ब आहे. स्थनिक लोकांना सुरक्षेचे उपायसुध्दा माहित नाहीत. लोकांना गृहीत धरून मुरगावात अमोनियाची हाताळणी होत आहे. हा प्रकार चालूच राहिल्यास लोकांच्या सुरक्षेसाठी आपल्याला लोकांसोबत रस्त्यावर उतरावे लागेल असा ईशारा आमदार संकल्प आमोणकर यांनी दिला आहे.