बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव जिल्हय़ातील प्रवाशांच्या सोयीसाठी बेळगाव-शेडबाळ-बेळगाव ही दररोज धावणारी जनसाधारण पॅसेंजर तूर्तास लांबणीवर टाकण्यात आली आहे. 1 जानेवारीपासून सुरू होणारी ही पॅसेंजर तांत्रिक कारणामुळे काही दिवसांनंतर धावणार असल्याची माहिती रेल्वे विभागाच्यावतीने देण्यात आली. यामुळे बेळगाव ते शेडबाळ दरम्यानच्या नागरिकांचा हिरमोड झाला आहे.
बेळगाव ते शेडबाळ (रेल्वे क्रमांक 06925) तर शेडबाळ ते बेळगाव (रेल्वे क्र. 06926) ही रेल्वे 1 जानेवारीपासून धावणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु तांत्रिक कारणामुळे ही रेल्वे काही दिवसांनंतर सुरू करण्यात येणार आहे. या रेल्वेच्या घोषणेमुळे बेळगाव ते शेडबाळ दरम्यानच्या नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. परंतु रेल्वे अचानक रद्द करण्यात आल्यामुळे आता नाराजी व्यक्त केली जात आहे.