प्रतिनिधी तरुण भारत संवाद / सोलापूर
श्री सिध्देश्वर यात्रेनिमित्त सोलापुरात दरवर्षी जनावरांचा मोठा बाजार भरत असून जनावर बाजार भरविण्यासंबंधी महापालिका प्रशासन आणि मंदिर समिती यांच्यात प्राणी संग्रहालयाच्या सुरक्षिततेवरून सुरू झालेल्या वादावर अखेर पडदा पडला आहे. मनपा प्रशासनाने आज शुक्रवारी मंदिर समितीला जागेचा ताबा दिला. तीन आठवडे लांबणीवर पडलेल्या जनावर बाजाराला मंगळवारी 7 जानेवारीपासून प्रारंभ होणार आहे.
मनपा प्रशासनाने मंदिर समितीला रेवणसिध्देश्वर परिसरात जनावर बाजार भरण्यासाठी जागेचा ताबा दिल्यानंतर समितीकडून स्वच्छतेला प्रारंभ झाला. दरम्यान जागेचा विषय न्यायप्रविष्ट असताना त्या जागेची स्वच्छता कशासाठी याविषयी गडदूरे यांनी पोलिसांना कळविले. जागेचा वाद उद्भवू नये याकरिता सदर बझार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे, जनावर बाजार समिती अध्यक्ष चिदानंद वनारोटे आणि प्राणीसंग्रहालयाचे डॉ. गोटे यांच्यात संयुक्त चर्चा झाली. त्यावेळी मंदिर समितीला प्रशासनाकडून रितसर जागेचा ताबा दिल्याने समितीने निदर्शनास आणून दिले तर डॉ. गोटे यांनी जनावर बाजारासाठी जागा निश्चित करून दिली. प्राणीसंग्रहालयाच्या नियमानुसार जनावर बाजार भरविण्यात यावे, याबाबत सूचनाही पोलीस निरीक्षक साळुंखे यांनी समितीला केले. समितीनेदेखील अनेक अटी मान्य करत समन्वयाचा मार्ग स्विकारला. त्यामुळे जागेचा तिढा सुटला आणि विषय निवळला.
प्राणी संग्रहालयालगतच्या जनावर बाजार भरण्यात येत असलेल्या 18 एकर जागेवर मनपा प्रशासन व गडदूरे यांच्यात वाद असून तो न्यायप्रविष्ट आहे. तसेच मंदिर समितीकडून गेल्या 50 वर्षांपासून या परिसरात जनावर बाजार भरविण्यात येत असल्याने मंदिर समितीने या जागेवर दावा करीत या प्रकरणात उडी घेतली आणि सर्वोच्च न्यायालयात मंदिर समितीला यात्रा कालावधीत दीड महिना जागेचा ताबा देण्याबाबत आयुक्त पातळीवर निर्णय घ्यावा, असे आदेश दिले. त्यानुसार आयुक्त डॉ. दीपक तावरे यांनी मंदिर समितीला 31 जानेवारीपर्यंत जागेचा ताबा दिले. मंदिर समितीने ताब्या मिळाल्यानंतर लगेच चार जेसीबी लावून जागा स्वच्छेच्या कामाला लागली आणि येत्या मंगळवारपासून जनावर बाजार भरण्यास सुरुवात होणार आहे.
अन्यथा दुसरीकडे जागा सूचवावी
मनपा प्रशासनाने जनावर बाजार भरण्यासाठी आज ताबा दिला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही रेवणसिध्देश्वर मंदिरात बाजार भरविण्यात येईल. या जागेचा विषय न्यायप्रविष्ठ असले तरी मंदिर समितीने सर्वोच्च न्यायालयातून दीड महिना बाजार भरविण्याची परवानगी आणली आहे. त्यामुळे मंदिर समितीला जनावर बाजारासाठी नियमाने ताबा दिला पाहिजे. मात्र तसे होत नाही, अडचण असल्यास प्रशासनाने अन्यत्र जागा सूचवावी.
– चिदानंद वनारोटे, अध्यक्ष, जनावर बाजार समिती
योग्य ती काळजी घ्यावी लागणार
प्राणीसंग्रहालयाचा संचालक या नात्याने प्राण्यांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने मी आयुक्तांना कळविले. त्यानुसार आयुक्तांनी संपूर्ण विषयाचा परिपूर्ण अभ्यास करून वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतला. त्यानुसार जागा ताब्यात दिली आहे. प्राण्यांना लसीकरण आणि जंतूनाशक डोस वेळोवेळी करणार. तसेच सुरक्षा भिंतीलगत बीएचसी पावडर व मोरचूद द्रावण टाकून परिसर निर्जंतुकीकरण करीत योग्य ती काळजी घेणार.
– डॉ. नितीन गोटे, संचालक, प्राणी संग्रहालय