मुंबई / वृत्तसंस्था :
सडेतोड बोलण्यासाठी ओळखली जाणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणाच्या गुन्हेगारांना भर चौकात फासावर लटकटविले जावे असे म्हटले आहे. निर्भया प्रकरणातील एक गुन्हेगार अल्पवयीन होता, पण जे बलात्कार करतात अशा लोकांना अल्पवयीन कसं समजलं जाऊ शकतं? बलात्कार करू शकणारा अल्पवयीन असूच शकत नसल्याचे कंगनाने म्हटले आहे.
बलात्कार काय असतो आणि त्याची शिक्षा काय असते हे या गुन्हेगारांना कळलंच पाहिजे. इतकी वर्षे निर्भयाचे आईवडिल जे सोसत आहेत, त्याचं काय? त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची अवस्था काय झाली असेल, एवढा संघर्ष करून ते कुठे जाणार..जर तुम्ही समाजासमोर उदाहरण ठेवणार नसाल तर या फाशीचा काय उपयोग? या गुन्हेगारांना चौकात उभं करून फाशी दिली पाहिजे असे कंगना म्हणाली.
कंगनाने वकील इंदिरा जयसिंगवरही आगपाखड केली आहे. इंदिरा जयसिंग यांच्यासारख्या स्त्रियांच्या पोटातूनच बलात्कारी जन्माला येतात. अशा स्त्रियांना बलात्काऱयांसोबत चार दिवस तुरुंगात डांबले जावे अशी संतप्त प्रतिक्रिया कंगनाने व्यक्त केली आहे. इंदिरा जयसिंग यांनी निर्भयाच्या आईकडे गुन्हेगारांना माफी देण्याचे आवाहन केले होते.
1 फेब्रुवारी रोजी फाशी
दिल्लीतील पतियाळा हाउस न्यायालयाने निर्भया बलात्कार प्रकरणातील 4 ही दोषींच्या विरोधात मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. या दोषींना 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वाजता फाशी देण्यात येईल.
महान होण्याची इच्छा नाही! निर्भयाच्या आईने कंगनाचे मानले आभार
निर्भयाच्या आईने कंगनाच्या भूमिकेवर सहमती दर्शवित स्वतःच्या मुलीच्या न्यायासाठी लढत असल्याचे विधान केले आहे. कंगनाकडून मिळालेल्या समर्थनासाठी तिचे आभार मानते. कुठल्याही प्रकारे मी महान होऊ इच्छित नाही. मी एक आई असून 7 वर्षांपूर्वी माझ्या मुलीचा जीव गेला असून आता केवळ न्याय हवा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
इंदिरा जयसिंग यांचे आवाहन म्हणजे मानवाधिकारांच्या नावाखाली समाजाला धोका देण्याचा प्रकार आहे. मुलींसोबत होत असलेल्या गुन्हय़ांना थट्टा ठरविण्याचा प्रयत्न इंदिरा जयसिंग यांचा आहे. जयसिंग मानवाधिकाराच्या नावावर उद्योग चालवत असून केवळ गुन्हेगारांना समर्थ देत असल्याचा आरोप निर्भयाच्या आईने केला आहे.