प्रतिनिधी/ सातारा
प्रजासत्ताक दिनाची शहरात जोरदार तयारी सुरू आहे. शाळा, कॉलेज व शासकीय कार्यालयात स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. तसेच पोलिसांच्या परेडची तयारी पोलीस परेड मैदानावर होत आहे. यात एनसीसी, आरएसपी, स्काऊट गाईडचे विविध शाळेचे विद्यार्थी तयारी करत आहेत. काही शाळांत देशभक्तीपर गीतावर नृत्याचे आयोजन करण्यात आले आहे. लेझिम, झांझ पथकांची तयारी जोरात सुरू आहे. तर शहरात स्वच्छता मोहीम वेगाने सुरू केली जात आहे.
71 वा प्रजासत्ताक दिन अवघ्या एक दिवसावर आला आहे. हा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यासाठी शहरातील शाळांमध्ये मुलांकडून तयारी करून घेतली जात आहे. यावेळी देशभक्तीपर कविता, गोष्टी, स्वागत, यांची पूर्व तयारी केली जात आहे. तर शाळेतील एनसीसी, आरएसपी, स्काऊट गाईडचे विद्यार्थी गेल्या 10 दिवसापासून परेडची तयारी करत आहेत. शाळेत देशभक्तीपर गाण्यावर नृत्य करण्यासाठी शाळा सुटल्यावर मुले तयारी करत आहेत. तसेच आपली शाळा स्वच्छ दिसण्यासाठी स्वच्छता केली जात आहे.
पोलीसांची परेड तयारी…
दरवर्षी प्रमाणे या वर्षी प्रजासत्ताक दिनाची पोलीस जोरदार तयारी करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून पोलीस परेड गाऊंडवर सकाळी परेडची पूर्व तयारी करत आहेत. आता पोलिसांबरोबर शाळेतील एनसीसी, आरएसपी, स्काऊट गाईडचे विद्यार्थी सुद्धा पोलीस परेड ग्राऊंडवर तयारी करत आहेत.
पालिकेची स्वच्छता मोहीम तेजीत…
प्रजासत्ताक दिन एक दिवसावर आला असून शहरात कचऱयाचे प्रमाण कमी दिसावे. यासाठी पालिकेकडून प्रयत्न होत आहेत. यामुळे कचरा उचलण्याचे काम जोरात सुरू आहे. ठिकठिकाणी पालिकेचे कर्मचारी कचरा उचलताना दिसत आहेत.
आत्मदहनाचा दिला इशारा…
आपल्या विविध मागण्यासाठी प्रजासत्ताक दिनी जिह्यातील 50 जणांनी आत्मदहनांचा इशारा दिला आहे. तर 30 जण उपोषण करणार आहेत. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयबाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त राहणार आहे. यातील काही जणांनी माघार घेत आहेत. अशी माहिती गृह खात्यातून देण्यात आली आहे.