जगभरात एकूण 42,00,957 कोरोनाबाधित : टाळेबंदी हटताच वुहानमध्ये 5 नवे रुग्ण
जगातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 42 लाख 957 वर पोहोचला आहे. तर 2 लाख 84 हजार 150 जणांना या संसर्गामुळे जीव गमवावा लागला आहे. परंतु या संकटादरम्यान दिलासा देणारी बाब म्हणजे 15 लाख 02 हजार 595 जणांनी कोरोना संसर्गावर मात करण्यास यश मिळविले आहे. आखातातील कुवेत या देशात 54 वर्षीय भारतीय दंतवैद्यकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. हा डॉक्टर सुमारे 15 वर्षांपासून कुवेतमध्ये वास्तव्यास होते. तर चीनमध्ये महामारीचा केंद्रबिंदू राहिलेल्या वुहानमधून टाळेबंदी हटविल्यावर पहिल्यांदाच 5 नवे रुग्ण सापडले आहेत. चीनमध्ये आतापर्यंत 82 हजार 918 बाधित सापडले आहेत.
जर्मनीत बाधितांचा आकडा वाढला
टाळेबंदी शिथिल केल्यावर जर्मनीत बाधितांचा आकडा वाढला आहे. रॉबर्ट कोच इन्स्टीटय़ूटनुसार जर्मनीत संसर्गाचा रिप्रॉडक्शन रेट सध्या 1 वरून वाढत 1.3 झाला आहे. टाळेबंदी हटविण्याच्या मागणीवरून जर्मनीत हजारो लोकांनी निदर्शने केली होती. तत्पूर्वी जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांनी 16 राज्यांच्या नेत्यांची चर्चा केल्यावर टाळेबंदी शिथिल करण्याची घोषणा केली होती. जर्मनीत 1,71,879 कोरोनाबाधित असून 7,569 जणांना जीव गमवावा लागला आहे.
अमेरिका : उपाध्यक्षांचे नाही
अमेरिकेचे उपाध्यक्ष माईक पेन्स 14 दिवसांसाठी विलगीकरणात जाणार नसल्याचे त्यांच्या कार्यालयाने स्पष्ट केले आहे. पेन्स यांच्या प्रवक्त्याला कोरोनाची लागण झाली आहे. पेन्स यांची चाचणी करण्यात आली असून त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर व्हाइट हाउसमध्ये अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सैन्य सहकाऱयाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. व्हाइट हाउसच्या टास्क फोर्समध्ये सामील डॉ. अँथनी फॉसी यांनी शनिवारपासून स्वयंविलगीकरणाचे पालन चालविले आहे.
अमेरिकेत दिवसात 776 बळी
अमेरिकेत मागील 24 तासांत 776 जणांचा मृत्यू झाला असून 20 हजारांपेक्षा अधिक नवे बाधित सापडले आहेत. अमेरिकेतील बळींचा आकडा 80,787 वर पोहोचला आहे. तर एकूण बाधितांची संख्या 13,67,963 झाला आहे. न्यूयॉर्कच्या केअर होम्समध्ये आठवडय़ात दोनवेळा कोरोना चाचणी व्हावी असे गव्हर्नर ऍन्ड्रय़ू क्यूमो यांनी म्हटले आहे. अमेरिकेत सुमारे 25 जणांचा मृत्यू केअर होम्समध्ये झाला आहे. यातील 5300 जणांचा बळी केवळ न्यूयॉर्कमध्ये गेला आहे. न्यूयॉर्क तसेच परिसरातील भागांमध्ये 15 मेपासून व्यवसाय सुरू करता येणार आहे. न्यूयॉर्क अमेरिकेतील महामारीचे केंद्रबिंदू ठरले आहे. न्यूयॉर्कमध्ये 26,670 जणांचा मृत्यू झाला असून 3 लाख 35 हजार 395 बाधित सापडले आहेत.
200 पाकिस्तानी मायदेशात परतले
अमेरिकेच्या वॉशिंग्टन डीसीमधून इस्लामाबादसाठी रविवारी पहिली फ्लाइट 200 पाकिस्तानी नागरिकांसह रवाना झाली आहे. पाक सरकारने अन्य देशांमध्ये अडकून पडलेल्या नागरिकांना परत आणण्यासाठी 6 चार्टर फ्लाइट्सची व्यवस्था केली आहे. अमेरिकेत सुमारे 1500 पाकिस्तानी अडकून पडले आहेत. दुसऱया फ्लाइटने सोमवारी 150 विद्यार्थ्यांना मायदेशी नेले जाणार असल्याची माहिती पाकिस्तानच्या दूतावासाने दिली आहे. पाकिस्तानात 30,941 बाधित सापडले असून 667 जणांचा मृत्यू झाला आहे.
चीन : शुलान शहरात टाळेबंदी
चीनच्या शुलान शहरात वाढत्या संसर्गामुळे टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. रविवारी शहरात 11 नवे रुग्ण आढळले होते. कपडे धुणाऱया महिलेच्या संपर्कात आल्याने रुग्णसंख्या वाढली आहे. महिलेला प्रवासाचा कुठलाही इतिहास नाही. शहरातील लोकांना घरातच थांबण्याचे आवाहन करण्यात आले आहे. चीनमध्ये आतापर्यंत 82 हजार 918 रुग्ण सापडले असून 4,633 जणांचा मृत्यू झाला आहे.
इटलीत : सर्वात कमी रुग्णांची नोंद
इटलीत मागील 24 तासांत केवळ 802 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर आणखीन 165 बाधितांचा मृत्यू झाला आहे. मागील दोन महिन्यांमध्ये एका दिवसातील हा सर्वात कमी आकडा ठरला आहे. इटलीत आतापर्यंत 30,560 बळी गेले असून 2,19,070 बाधित सापडले आहेत.
ब्रिटनमध्ये 1 जूनपर्यंत टाळेबंदी
ब्रिटनमध्ये आतापर्यंत 31,855 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात 2,19,183 बाधित असून जगातील हा तिसऱया क्रमांकाचा सर्वात ग्रस्त देश ठरला आहे. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी 1 जूनपर्यंत टाळेबंदी लागू केली आहे. परंतु पुढील काळात अधिक कठोर नियम लागू नसतील. पंतप्रधानांनी आता ‘स्टे होम’च्या ऐवजी ‘स्टे अलर्ट’चा नारा दिला आहे. सार्वजनिक ठिकाणे 1 जुलैपासून सुरू करता येणार असल्याचे जॉन्सन म्हणाले.
ब्रिटनमध्ये काय बदलणार…
1 लोकांना बुधवारपासून व्यायाम करणे, उद्यानात बसणे, सूर्यस्नान, कुटुंबीयांसोबत खेळण्याची अनुमती असेल.
2 दोन वेगवेगळय़ा घरातील लोक उद्यानात भेटू शकतील. परंतु त्यांना 2 मीटर अंतराची काळजी घ्यावी लागेल.
3 घरातून काम करता येत नसलेले लोक कार्यालयात जाऊ शकतील. परंतु त्यांनी सार्वजनिक परिवहन व्यवस्थेचा वापर टाळावा.
4 शक्य असल्यास लोकांनी घरातच थांबावे.