डिचोली/प्रतिनिधी
पार्वतीनगर कुळण सर्वण डिचोली येथून अपहरण झाल्याचा दावा करण्यात आलेली महिला काल बुध. दि. 8 जुलै रोजी सकाळी सर्वण बसस्टॉपवर दोन्ही हातांना मागच्या बाजूस व डोळय़ांना पट्टी बांधलेल्या अवस्थेत आढळून आली. सदर महिला बेशुद्धावस्थेत अवस्थेत होती तर शुध्दीवर आल्यानंतर सदर महिलेने आपल्याया एका कारगाडीत चार जणांनी बळजबरीने बसविले आणि अपहरण केल्याची जबानी दिली आहे. त्यामुळे प्रथमदर्शनी हे प्रकरण अपहरणाचे असल्याचे सिध्द होत असल्याने डिचोली पोलिसांनी चार अज्ञातांविरोधात गुन्हा नोंदविला आहे.
गेल्या शनि. दि. 4 जुलै रोजी दुपारी 3 वा. नंतर पार्वतीनगर कुळण सर्वण येथील अल्पना अविनाश मायणीकर (वय 42) हि पारिचारीका बेपत्ता झाली होती. कुडणे येथील तिच्या आईच्या घरी मालमत्तेच्या विषयावरून वादाचे प्रकरण निर्माण झाल्याने त्या किहीशा निराश होत्या. त्यानंतर दुपारी घरी आल्यानंतर 3 वा. च्या सुमारास त्या घरातून बेपता झाल्या होत्या. घरच्यांनी यांची सर्वत्र शोधाशोध केल्यानंतर शनिवारीच रात्री डिचोली पोलीस स्थानकात बेपत्ता म्हणून तक्रार नोंदवली होती.
दुसऱया दिवशी रविवारी त्या मिळू न शकल्याने त्याच दिवशी त्यांच्या अपहरणाची तक्रार घरच्यां?नी पोलीस स्थानकात नोंदवली होती. सदर तक्रारीत सहा जणांची संशयीत म्हणून नावे देण्यात आली होती. डिचोली पोलिसांनी सदर संशयीत सहा जणांना पोलीस स्थानकात बोलवून घेत त्यांची चौकशी केली होती. तसेच इतरही दृष्टीने पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरूच होता.
काल सर्वण बसस्टॉपवर आढळून आली महिला
या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू असतानाच काल बुध. दि. 8 जुलै रोजी सकाळी सर्वण बसस्टॉपवरील आसन व्यवस्थेवर अल्पना मायणीकर या झोपलेल्या अवस्थेत आढळून आल्या. यावेळी त्यांचे दोन्ही हात मागच्या बाजूने बांधण्यात आले होते. तर डोळय़ांना पट्टी बांधण्यात आली होती व ती बेशुद्धावस्थेत होती. या प्रकाराची माहिती डिचोली पोलिसांना मिळताच त्यांनी सर्वण येथे धाव घेतली. व अल्पना यांना सर्वप्रथम डिचोली सामाजिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करून तिला म्हापसा येथे आजिलोत अधिक उपचारासाठी नेण्यात आले.
चार जणांकडून कारगाडीतून करण्यात आले अपहरण ?
शनि. दि. 4 रोजी दुपारी एक पांढऱया रंगाची मारूती 800 कारगाडी आली. त्यात दोन महिला व दोन पुरूष होते. त्यांनी बळजबरीने आपल्याला गाडीण कोंबले व आपल्याला घेऊन गेले. त्यानंतर आपल्याला काहीच आठवण नाही. त्यांनी आपल्याला कुठे नेले ते माहित नाही. सकाळीही आपण कुठे आहे ते आपल्याला माहिती नव्हते. शुध्दीवर आल्यानंतर आपण इस्पीतळात असल्याचे जाणवले, अशी जबानी अल्पना यांनी पोलिसांना दिली आहे. सदर जबानी एनजीओ समोर पोलिसांनी नोंदवली आहे.
चार अज्ञातांविरोधात गुन्हा नोंद.
अल्पना यांच्या जबानीनंतर डिचोली पोलिसांनी त्यांनी आपल्या जबानीत सांगितल्याप्रमाणे चार अज्ञातांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी डिचोली पोलीस निरीक्षक संजय दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक किशोर रामानंद अधिक तपास करीत आहे. डिचोली पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी व आम्हला न्याय मिळवून द्यावा. तसेच या प्रकरणात गुंतलेल्या सर्वांना त्वरीत गजाआड करावे, अशी मागणी अल्पना यांचे भाऊ डॉ. नवनाथ मांदेकर यांनी केली आहे.