1,018 जण कोरोनामुक्त : 24 तासांमध्ये 93 बाधितांचा बळी
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाटय़ाने वाढ होत असून रुग्णसंख्या 60 हजाराच्या उंबरठय़ावर येऊन पोहोचली आहे. मागील 24 तासांमध्ये 4,537 नव्या बाधितांची भर पडली. आतापर्यंत दिवसभरात आढळून आलेली ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. शनिवारी 1,018 जण कोरोनामुक्त झाले तर 93 जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्य आरोग्य खात्याने प्रसिद्ध केलेल्या हेल्थ बुलेटिननुसार राज्यातील एकूण रुग्णसंख्या 59,652 वर पोहोचली आहे. तर 21,775 जण संसर्गमुक्त होऊन घरी परतले आहेत. शनिवारी सायंकाळपर्यंत उपचारातील रुग्णांचा आकडा 36,631 इतका होता. कोरोनाबळींची संख्या 1,240 इतकी झाली आहे.
बेंगळूर शहरात शनिवारी 2,125 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 250 जण संसर्गमुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिवसभरात येथील 49 रुग्ण दगावले आहेत. आतापर्यंत बेंगळूर शहरात 29,621 रुग्ण आढळले आहेत. सध्या या जिल्हय़ात 22,449 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 6,540 इतकी आहे.
मागील 24 तासांमध्ये बेंगळूरमध्ये 2,125, मंगळूरमध्ये 509, धारवाड 186, विजापूर 176, बळ्ळारी 155, बेळगाव 137, कारवार 116, शिमोगा 114, उडुपी 109, चिक्कबळ्ळापूर 107, म्हैसूर 101, बेंगळूर ग्रामीण 94, गुलबर्गा व गदगमध्ये प्रत्येकी 82, बिदर 72, दावणगेरे 56, हासन 51, मंडय़ा 42, कोलार 35, चामराजनगर 34, तुमकूर व चिक्कमंगळूर प्रत्येकी 24, चित्रदुर्ग 22, रायचूर 16, हावेरी 15, बागलकोट व कोप्पळ प्रत्येकी 13, कोडगू 10 तसेच यादगीर जिल्हय़ात 4 नवे रुग्ण आढळून आले आहेत.