औपचारिक घोषणेची प्रतीक्षा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
बीसीसीआय क्रिकेट ऑपरेशन्सचे सरव्यवस्थापक व माजी यष्टिरक्षक साबा करीम यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याचे समजते. त्याबाबतची औपचारिक घोषणा लवकरच करण्यात येणार आहे.
करीम यांनी डिसेंबर 2017 मध्ये या पदाचा कार्यभार स्वीकारला होता, त्यावेळी सीईओ राहुल जोहरी यांच्या अध्यक्षतेखाली त्यांची निवड करण्यात आली होती. जोहरी यांनीही गेल्याच आठवडय़ात सीईओ पदाचा राजीनामा दिला असून तो स्वीकारण्यातही आला आहे. साबा करीम यांच्या जागी कोणाची नियुक्ती होणार, याबाबत अद्याप चर्चा झालेली नाही.
52 वर्षीय करीम यांनी एक कसोटी व 34 वनडेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. बीसीसीआयने त्यांना हे पद सोडण्यास सांगितले होते. पण त्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र त्यांच्या स्थानिक क्रिकेटच्या नियोजनावर बीसीसीआय समाधानी नसल्याचे मानले जात आहे. ‘करीम यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आले, हे खरंय. कोव्हिड 19 च्या पार्श्वभूमीवर त्यांना स्थानिक क्रिकेटचे समाधानकारक नियोजन करता आले नाही, हे त्यामागचे एक कारण आहे,’ असे बीसीसीआयमधील सूत्राने सांगितले.
भारतातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने या वर्षीचा क्रिकेट मोसम डिसेंबरआधी सुरू होण्याची अजिबात शक्यता नाही. शिवाय सप्टेंबर-नोव्हेंबर या कालावधीत आयपीएल स्पर्धा होण्याची अपेक्षा आहे. तसे झाल्यास त्या कालावधीत स्थानिक क्रिकेट खेळता येणार नाही. सीईओ जोहरी यांनी राजीनामा दिल्यानंतर आठवडाभरातच या घडामोडी झाल्या आहेत. सौरभ गांगुली यांच्या अध्यक्षतेखालील बीसीसीआयची नवी कार्यकारिणी आल्यावर मंडळाच्या अर्थखात्याचे प्रमुख संतोष रांगणेकर यांनीही गेल्या वर्षी राजीनामा दिला होता.