एका रात्रीत आयडी इस्पितळ खाली करण्याचा : प्रयत्न मगो पक्षाकडून विरोध
प्रतिनिधी / फोंडा
फोंडय़ातील उपजिल्हा इस्पितळाचे (आयडी) कोविड इस्पितळात रुपांतर करण्याचा सरकारचा निर्णय म्हणजे इतर रुग्णांच्या जीवाशी चाललेला खेळ आहे. फोंडा तालुक्यातील रुग्णांसाठी वैद्यकीय सेवेची जवळपास अन्य कुठलीच पर्यायी सोय नाही. अशा परिस्थितीत आयडी इस्पितळातील सर्व सेवा बंद करुन याठिकाणी कोविड इस्पितळ उभारण्यास जोरदार मगो पक्षाने जोरदार विरोध सुरु केला आहे.
फोंडय़ातील आयडी इस्पितळ खाली करुन त्याठिकाणी कोविड इस्पितळ सुरु करण्याचा सरकारने आदेश काढताच, रविवारी सायंकाळी तशा हालचालीही सुरु झाल्या. इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या शंभरहून अधिक रुग्णांना रविवारी रात्रीच बांबोळी येथील गोमेकॉत हलविण्याचे प्रयत्न होते. त्यासाठी आरोग्य खात्याचे संचालक डॉ. ज्यो डिसा हेही आयडी इस्पितळात पोचले होते. या बातमीचा सुगावा लागताच म. गो. पक्षाचे नेते आमदार सुदिन ढवळीकर, डॉ. केतन भाटीकर यांच्यासह कार्यकर्ते व अन्य नागरिक मिळून साधारण दोनशेच्या आसपास लोक इस्पितळाच्या आवारात जमले. इस्पितळाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विकास कुवेलकर यांना बोलावून घेण्यात आले. तोपर्यंत डॉ. डिसाही तेथे पोचले होते. आमदार सुदिन ढवळीकर व डॉ. भाटीकर यांनी सरकारचा हा निर्णय केवळ चुकीचाच नसून फोंडय़ातील नागरिकांना वेठीस धरणारा आहे. त्याला आमचा विरोध असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी फोंडा पालिकेचे काही नगसेवक, तसेच कुर्टी व मडकई मतदार संघातील विविध पंचायतींचे सरपंच व पंचसदस्यही उपस्थित होते.
दरवेळी फोंडा तालुकाच का ?
कोरोना रुग्णांच्या सोयीसाठी फोंडा तालुक्यातील नागरिक आजवर सहकार्यच करीत आले आहेत. शिरोडा व फर्मागुडी येथे कोविड निगा केंद्र तसेच दोघा कोरोना रुग्णांच्या मृत्यूनंतर वास्को येथे अंत्यसंस्कार करण्यास विरोध झाल्यानंतर फोंडय़ातील नागरिकांनीच उदार मनाने सहकार्य केले. याचा अर्थ प्रत्येक गोष्टीसाठी फोंडा तालुक्याला सरकार वेठिस धरु शकत नाही. फोंडय़ातील उपजिल्हा इस्पितळ ही येथील नागरिकांची गरज आहे. फोंडा पालिका क्षेत्रासह तालुक्यातील एकोणीस ग्रामपंचायत क्षेत्रातील रुग्ण याठिकाणी नियमित उपचारासाठी येतात. विविध रोगांवरील उपचार व छोटय़ा मोठय़ा शस्त्रक्रियाही करुन घेण्यासाठी अनेक लोक या इस्पितळावर अवलंबून आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे फोंडय़ातील बरेच खासगी दवाखाने व इस्पितळातील वैद्यकीय सेवा सध्या मर्यादित स्वरुपात सुरु आहेत. त्यामुळे छोटय़ा मोठय़ा आजारांवर उपचार घेण्यासाठी येथील लोकांना या सरकारी इस्पितळावरच अवलंबून राहावे लागत आहे. शिवाय इस्पितळाला लागूनच मोठी लोकवस्तीही आहे. सरकार फोंडय़ातील ही अत्यावश्यक सेवा बंद करुन त्याठिकाणी कोविड इस्पितळ उभारणार असेल तर त्याला जनतेचा विरोध असल्याचे आमदार ढवळीकर यांनी सांगितले.
कोविड इस्पितळाला विरोध नाही, इतर रुग्णांच्या सोयीचे बोला ?
सध्या फोंडय़ातील उपजिल्हा इस्पितळात शंभरच्या आसपास रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामध्ये प्रसुत झालेल्या महिला, विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यात आलेले रुग्ण तसेच लहान मुलांचाही समावेश आहे. त्यांच्या जीवाला कुठल्याच प्रकारचा धोक न पोचता सुरक्षितपणे गोमेकॉत पोचविण्याची लेखी हमी सरकार देईल काय ? असा प्रश्न डॉ. भाटीकर यांनी उपस्थित केला. या रुग्णा व्यतिरिक्त इस्पितळाच्या बाहय़रुग्ण विभागात दिवसाकाठी दोनशे ते अडीचशे रुग्ण तपासणीसाठी येतात. कॅज्युलिटी विभागातही शंभरच्या आसपास रुग्णांवर नियमीत उपचार केले जातात. बालरोग, महिला प्रसुती विभाग, अस्थिरोग, नेत्रचिकित्सा, कान, नाक व घसा अशा विविध रोगांवरील उपचारासाठी याठिकाणी स्वतंत्र विभाग आहेत. या सर्व वैद्यकीय सेवा एका रात्रीत बंद करण्याचा सरकारचा विचार असल्यास फोंडा तालुक्यातील सर्व रुग्णांना यापुढे उपचारासाठी गोमेकॉत जावे लागणार आहे. ज्यामुळे रुग्णांचे तर हाल होणारच, शिवाय त्यांच्या कुटुंबाची प्रचंड ओढाताण होणार आहे. आमचा कोविड इस्पितळाला विरोध नाही, मात्र जनतेची एवढी मोठी गैरसोय करुन याठिकाणी कुठल्याच परिस्थितीत ते उभारण्यास विरोध असल्याची भूमिका म. गो. पक्षाने घेतली आहे.
सुदिन ढवळीकरांची मुख्यमंत्र्यांशी फोनवर चर्चा
आमदार सुदिन ढवळीकर यांनी यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी फोनवर संपर्क साधून येथील परिस्थितीची त्यांना कल्पना दिली. फोंडय़ातील आयडी इस्पितळात प्रत्येक रुग्णाच्या खाटेपर्यंत कृत्रिम प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन पोचविणाऱया वाहिन्यांची सोय आहे. त्यामुळे फोंडा इस्पितळाची निवड करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. डॉ. डिसा यांनीही तसा खुलासा केला. पण इतर रुग्णांना छोटय़ा मोठय़ा उपचारांसाठी गोमेकॉत जाणे भाग पडणार. एखादा अपघात घडल्यास किंवा इतर आपत्कालीन वेळी रुग्णाला गोमेकॉत नेईपर्यत त्याच्या जीवावर बेतण्याची शक्यता अधिक आहे. त्याची जबाबदारी कोण घेणार याचे उत्तर किंवा त्यावर पर्यायी सोय करण्याची उपययोजना होईपर्यंत सरकारला फोंडय़ात कोविड इस्पितळ उभारता येणार नाही, असे आमदार सुदिन ढवळीकर यांनी सांगितले.
फोंडाच कशाला कुडचडे का नाही !
कुडचडे येथील सरकारी इस्पितळात ऑक्सिजन वाहिनीची तशी सोय आहे व तेथे तिनशे खाटांची व्यवस्थाही आहे. हे इस्पितळ सध्या खाली असून तेथे कोविड इस्पितळ उभारण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली. या चर्चेनंतर आपण मुख्यमंत्र्यांशी पुन्हा एकदा याविषयी बोलणी करण्याचे आश्वासन आरोग्य संचालक डॉ. डिसा यांनी यावेळी दिले.