ऑनलाईन टीम
दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने इसिसच्या दहशतवाद्याला पकडत दहशतवाद्यांचा मोठा कट उधळून लावला आहे. दहशतवादी अबू युसूफ याच्या चौकशीदरम्यान धक्कादायक माहिती पुढे आली आहे. अयोध्येतील राम मंदिरांच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे दहशतवादी नाराज असून त्याचा बदला म्हणून दिल्ली आणि उत्तर प्रदेशात मोठा बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा दहशतवाद्यांचा बेत होता, असा खुलासा अबू युसूफने केला आहे. पोलिसांनी त्याच्याकडून आईडी स्पोटकांचा मोठा साठा जप्त केला आहे.
अबू युसूफ अफगाणिस्तानातील काही साथिदारांच्या संपर्कात होता. विशेष म्हणजे तो मूळचा उत्तर प्रदेशच्या बलरामपूर जिल्ह्यातील एका गावाचा रहिवासी असल्याचं पुढे आलंय. दिल्ली आणि उत्तर प्रदेशात हल्ले घडवून आणण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी अलर्ट जारी केला आहे. तसेच पोलिसांकडून त्याची कसून चौकशी सुरु आहे.
दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाचे डीसीपी प्रमोदसिंग कुशवाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, धौला कुआंमध्ये दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने केलेल्या कारवाईनंतर इसिसच्या एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली. आणखी काही दहशतवाद्यांना अटक करण्यात येऊ शकते. दिल्ली पोलिसांनी दहशतवाद्यांचा मोठा कट उधळून लावला आहे. IED स्फोटकांचा साठा जप्त केला आहे. अबू युसूफ या दहशतवाद्याकडून दोन IED स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत.