अर्थव्यवस्थेवर प्रभाव
जून तिमाहीपर्यंत न्यूझीलंडच्या जीडीपीत 12.2 टक्क्यांची घट नोंदली गेली आहे. 1987 नंतर अर्थव्यवस्थेतील ही सर्वात मोठी घसरण आहे. जीडीपीतील घसरणीमागे कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेले निर्बंध कारणीभूत असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. निर्बंधांमुळे व्यापार, पर्यटनक्षेत्राला मोठा फटका बसला आहे. पर्यटन क्षेत्रातूनच न्यूझीलंडला सर्वाधिक महसूल प्राप्त होतो.
युएन प्रमुखांचे आवाहन
कोविड-19 चा मुकाबला करायचा असल्यास जगातील सर्व देशांना एकत्र यावे लागणार आहे. सद्यकाळात जगासाठी कोरोना महामारीच सर्वात मोठा धोका आहे. यावर विजय मिळविण्यासाठी जगाला एकत्र आणि एका व्यासपीठावर यावे लागणार आहे. असे केल्याशिवाय आम्ही महामारीवर नियंत्रण मिळवू शकणार नाही असे उद्गार संयुक्त राष्ट्रसंघाचे प्रमुख अँटोनियो गुतेरेस यांनी काढले आहेत.
पाकिस्तान : काही शाळा बंद
आरोग्य संबंधित नियमांचे पालन न केल्याने 48 तासांमध्येच पाकिस्तानात 22 शैक्षणिक संस्था बंद करविण्यात आल्या आहेत. या संस्थांमध्ये महामारीच्या पार्श्वभूमीवर लागू मापदंडांचे पालन करण्यात आले नव्हते असे पाकच्या नॅशनल कमांड ऑपरेशनकडून सांगण्यात आले. कोविड-19 संक्रमणामुळे मार्च महिन्यात बंद झालेल्या पाकिस्तानच्या शैक्षणिक संस्था मंगळवारपासून सुरू करण्यात आल्या आहेत.