दिवसभरात कोरोनाचे 85,362 नवे रुग्ण, 1089 जणांचा मृत्यू
नवी दिल्ली :
जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यात अद्यापही यश आलेले दिसत नाही. अजूनही देशात एका दिवसात साधारणपणे 80 हजारहून अधिक रुग्ण सापडत आहे. देशात संसर्ग दिवसेंदिवस अधिकच वाढताना दिसत आहे. आतापर्यंतच्या कोरोनाबाधितांच्या एकूण संख्येने आता 59 लाखांचा टप्पा देखील ओलांडला आहे. एकूण कोरोनाबाधितांची संख्या 59 लाख 3 हजार 932 वर पोहोचली आहे. मागील 24 तासात देशभरात 85 हजार 362 नवे बाधित आढळले असून, 1,089 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
देशभरातील एकूण 59 लाख 3 हजार 933 कोरोनाबाधितांमध्ये 9 लाख 60 हजार 969 सक्रीय रुग्ण आहेत. योग्य उपचारांमुळे कोरोनामुक्त होणाऱयांमध्ये मात्र वाढ झालेली दिसून येत आहे. शनिवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासात तब्बल 93 हजार 420 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत देशात 48 लाख 49 हजार 584 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत मृत्यू झालेल्यांचा आकडा 93 हजार 379 वर पोहोचला असल्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून सांगण्यात आले. दरम्यान, 25 सप्टेंबरपर्यंत देशात एकूण 7 कोटी 2 लाख 69 हजार 975 नमुने तपासण्यात आले. त्यातील 13 लाख 41 हजार 535 नमुन्यांची शुक्रवारी तपासणी झाली असल्याचे ‘आयसीएमआर’ने स्पष्ट केले आहे.