सायलीने पहिलीपासूनचे इतिहासाचे पुस्तक ठेवले जपून
प्रतिनिधी/ सातारा
छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे स्वराज्य उभे केले. उभे असलेले गडकोट आज ऊर्जा देण्याचे काम करत आहेत. ज्यांच्या मनात, ह्रदयात शिवभक्ती भरलेली आहे. ते शिवभक्त आपल्या लाडक्या छत्रपती शिवरायांच्या गटकोटावर जाणार, त्याच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणार, आपल्या मुलांना ही बाळकडू देणार, असाच अनोखा शिवभक्त वाई तालुक्यातील गुळुंब गावचे प्रमोद भोसले-पाटील हे आहेत. गेल्या दोन वर्षात त्यांनी व त्यांची कन्या सायली हिने राज्यातील 50 गडांची भ्रमंती केली आहे. सायली इयत्ता 9 वी ला असून तिने तर छत्रपती शिवाजी महाराजाच्या चरित्राचे पठण सुरू केले आहे.
सह्याद्रीच्या कुशीत राबणाऱया कष्टकरी जनतेची लूट सुलतानी संकटाने सुरू होती. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेचे स्वराज्य उभे केले. जुलमी, अन्यायी शाह्यांना त्यांची जागा दाखवून देत रयतेला सुखी ठेवले. अनेक गडकोट त्यांनी उभे केले. हे गटकोट आज शिवभक्तांना प्रेरणा देतात. वाई तालुक्यातील गुळुंब गावचे शिवभक्त प्रमोद भोसले-पाटील यांना लहानपणापासून गडकिल्ल्यांच्या भ्रमंतीची आवड आहे. गावातील शिवजयंतीमध्ये ते मोठा उत्साहाने सहभागी होत असतात. स्वतःचा काही दिवस मंडप, साउंड सीसटीमचा व्यवसाय होता. पुढे आयसीआयसी बँकेत नोकरी लागली. कुटूंबियाच्या सहकार्याने त्यांचा गडकोट भ्रमंती आणि शिवभक्तीचे वेड कायम राहिले. ते सहयाद्री प्रतिष्ठानचे दुर्ग सेवक आहेत.
राज्यातील अनेक गडकोट त्यांनी फिरले आहेत. नुसते गडावर जाऊन फिरून आले नाहीत तर शिवकार्य ही सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून केले आहे. वाई तालुक्यातील पांडव गड, कमळगड, वैराटगड हे लहानपणीच त्यांनी अनेकवेळा पाहिले. परंतु अजून ही ते या गडावर आवर्जून जातात. किल्ले वंदनेश्वरच्या संवर्धन मोहिमेत सहभाग असतो. लातूर जिह्यातील गडावर तोफ संवर्धनात सहभाग घेतला होता. एवढेच नाही तर त्यांची कन्या सायली ही इयत्ता नववीला आहे. वडिलांची शिवभक्ती पाहून तिने ही पहिलीपासून इतिहास विषयाचे पुस्तक जपून ठेवले आहे. जेवढे जेवढे छत्रपती शिवाजी महाराजांचे साहित्य वाचायला मिळेल ऐकायला मिळेल तेवढे तेवढे ती आत्मसात करते आहे. शिवाव्याखातें प्रा. नितीन बानूगडे पाटील यांच्या व्याख्यानाची पारायणे केली आहेत. प्रमोद भोसले-पाटील यांनी तिला सोबत घेऊन 4 किल्ले दाखवले. लहानपणीच छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तिने आत्मसात केला आहे.
कोथळीगडावर गारद, शिव पराक्रमाचा पोवाडा
प्रत्यक्षात गडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास व इतिहासातल्या घटना लेकीला सांगणारे प्रमोद भोसले-पाटील.यांच्या दोन पाऊले पुढे त्यांची लेक सायली ही आहे.गारद देणं तसं खूप अवघड.आवाज व ताकद चांगली असावी लागते.गारद दिल्याने मावळ्यांना प्रेरणा येते.तिच गारद सायलीने कोथळीगडावर दिली होती.उपस्थित दुर्ग सेवकाना क्षणभर शिवकाळात गेल्याचा भास झाला.तर ती पोवाडा ही चांगला सादर करते.शाळेतल्या नाटकात तिने ऐतिहासिक भूमिका साकारल्या आहेत.
मुलांच्यात शिवभक्ती निर्माण व्हावी म्हणून धडपड
आज आपल्या आजूबाजूला छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले गडकिल्ले आहेत.हे गडकिल्ले प्रेरणा देण्याच काम करतात.मी जे काम करतो ते मुलांच्यात शिवभक्ती निर्माण व्हावी, त्यांच्या हातून सदकार्य घडावे याच हेतूने काम करतो आहे.मग कोणतीही संघटना असेल त्यास सहकार्य करतो, असे प्रमोद भोसले-पाटील यांनी सांगितले.
आज ही प्रबळगडाची मोहीम
बँकेतले काम करून आपला छंद ते जोपासतात.सुट्टीच्या दिवशी आठवडय़ातुन एक मोहीम ठरलेली असते.मग ती महाराष्ट्रात कुठल्याही ठिकाणी असो.अगदी बा रायगड पासून ते चंदेरी किल्ला असेल.रविवार दि.27रोजी प्रबळगडावर मोहीम फत्ते केली.