पाहणीसाठी पोहोचले पुरातत्व विभागाचे पथक : समोर येणार नवा इतिहास
वृत्तसंस्था / उज्जैन
कित्येक शतके जुन्या उज्जैनमधील महाकाल मंदिर परिसरात खोदकामादरम्यान एका प्राचीन मंदिराचे अवशेष मिळाले आहेत. या घटनेनंतर तेथील खोदकाम रोखण्यात आले आहे. तर केंद्रीय पर्यटनमंत्री प्रल्हाद पटेल यांच्या निर्देशानुसार पुरातत्व विभागाच्या पथकाने बुधवारी संबंधित परिसराची पाहणी केली आहे. हे अवशेष सुमारे 1 हजार वर्षांपूर्वीच असावेत, असे उद्गार पथकातील एका सदस्याने काढले आहेत.
केंद्रीय पथकात पुरातत्व सर्वेक्षणाच्या भोपाळ विभागाचे अधिकारी सामील होते. यात पुरातत्वतज्ञ डॉ. पियूष भट्ट आणि खजुराहो येथील के.के. वर्मा यांचा समावेश होता. दोन्ही अधिकाऱयांनी खोदकाम परिसराचे बारकाईने निरीक्षण केले आहे. संबंधित पथक वस्तुस्थितीदर्शक अहवाल तयार करणार आहे.
नक्षीकाम पाहता हे दहाव्या आणि अकराव्या शतकातील मंदिर वाटत आहे. पुढील खोदकाम आता सावधपणे करावे लागणार आहे. त्यानंतर एक नव्या तसेच दडलेल्या इतिहासाचा शोध लागणार असल्याचे पुरातत्व विभागाच्या अधिकाऱयाने म्हटले आहे.
परमारकालीन अवशेष?
तर खोदकामानंतर मिळालेल्या या प्राचीन मंदिरासंबंधी अधिक माहिती मिळू शकलेली नाही. सध्या केवळ मंदिराचे अवशेष समोर दिसून येत आहेत. अशा स्थितीत मंदिर नेमके कुठपर्यंत पसरले असावे हे सांगणे अवघड आहे. याचमुळे तज्ञांचे पथक प्रत्येक गोष्टीची बारकाईने पाहणी करत आहे. या पाहणीनंतरच या क्षेत्राच्या ऐतिहासिक महत्त्वासंबंधी माहिती मिळू शकणार आहे. अवशेषांवरील नक्षीकाम परमार काळातील असण्याची शक्यता काही तज्ञ व्यक्त करत आहेत.
अध्ययनाची गरज
उज्जैनमध्ये महाकाल मंदिराच्या विस्तारीकरणाचे काम सध्या सुरू आहे. मागील गुरुवारी मंदिराच्या मुख्य द्वारानजीक खोदकाम सुरू करण्यात आले होते. सती माता मंदिरामागे जमिनीत दगडी स्तंभ दिसून आल्याने खोदकाम रोखण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी संबंधित सावधपणे खोदकाम करण्यात आले असता मंदिराचे स्वरुप दिसू लागले असून घटनास्थळी मंदिराच्या कळसा हिस्सा निदर्शनास पडतो.