औंध/ प्रतिनिधी
जीवनात कुस्तीला अनन्यसाधारण महत्त्व देणारा नवोदित मल्लांचा आयडाँल आणि राज्यातील कुस्तीशौकिनांच्या गळ्यातील ताईत जागतिक पदक विजेता डीवायएसपी अर्जुनवीर राहूल आवारे आज लग्नाच्या बेडीत अडकला. अर्जुनवीर काकासाहेब पवार यांची कन्या ऐश्वर्या बरोबर पुण्यात मोजक्या लोकांच्या उपस्थित हा विवाह सोहळा आनंदी वातावरणात पार पडला.
बीड जिल्ह्यातील पाटसचा सुपुत्र राहूलने गुरु रुस्तुम- ए- हिंद स्व. हरिश्चंद्र बिराजदार आणि अर्जुनवीर काकासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पाटस व्हाया पुणे मार्गे आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवला आहे. राज्य राष्ट्रीय पातळीवर तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत राष्ट्रकुल, एशियन चँम्पियनशिप, काँमनवेल्थ आणि जागतिक कुस्ती स्पर्धेत पदक मिळवून महाराष्ट्राची मान दिल्लीच्या तख्तावर उंचावली आहे. गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलाचे संस्थापक अर्जुनवीर काकासाहेब पवार यांची कन्या ऐश्वर्या हिच्याबरोबर राहुलचा वाड्निश्चय झाला होता. मात्र संपूर्ण आयुष्य कुस्तीला वाहिलेल्या राहुलने लग्न बाजूला ठेवून काँमनवेल्थ स्पर्धेवर लक्ष केंद्रित करून देशाला पदक मिळवून दिले. आणि डीवायएसपी पदाचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून नुकतीच त्याने पुणे जिल्हा ग्रामीणची सुत्रे हाती घेतली आहेत.
डिसेंबरमध्ये जागतिक चषक स्पर्धेत त्याचे थोडक्यात पदक हुकले आहे. गेल्या वर्षभराच्या धावपळीतून थोडीशी उसंत मिळाल्याने आज गोरज मुहूर्तावर ऐश्वर्या सोबत विवाह सोहळा उत्साहात संपन्न झाला. कुस्ती, राजकीय, कला क्रीडा क्षेत्रातील अनेकांनी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून वधूवरांना शुभाशीर्वाद दिले. अर्जुनवीर काकासाहेब पवार, शिवछत्रपती गोविंदतात्या पवार आणि जीवनगौरव विजेते बाळासाहेब आवारे, पै गोकुळ आवारे यांनी सर्वांचे स्वागत केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांना आपल्या लाडक्या मल्लाच्या लग्नास उपस्थित राहता आले नसले तरी अनेकांनी नवदाम्पत्यास मनापासून शुभेच्छा दिल्या.