गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केले स्पष्ट : सर्व विरोधक एकत्र येणार
प्रतिनिधी / मडगाव
सध्याच्या महामारीच्या काळातही स्वतःच्या स्वार्थासाठी सामान्य लोकांशी प्रतारणा करणाऱया राज्य सरकारला सर्व विरोधकांना एकत्र करून या अधिवेशनात उघडे पाडू, असे गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी म्हटले आहे.
या महामारीच्या काळात सरकार लोकांच्या मदतीला धावून जाण्याऐवजी स्वतःचा स्वार्थ साधण्यात मग्न होते. लोकांच्या प्रखर विरोधानंतर या सरकारने आपली लोकविरोधी कारस्थाने रद्द केली. या सरकारने म्हादई विकली, कोळशाची वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी तीन प्रकल्पांना हे सरकार पाठिंबा देत आहे. ओल्ड गोवा ग्रेटर पणजी पीडीएत सामिल करणे, गोव्यात गांजाची लागवड करणे हे निर्णय तसेच शेळ-मेळावली आयआयटी प्रकल्प आणि नगरपालिका अध्यादेश या सरकारने लोकविरोधामुळेच रद्द केला, असे त्यांनी म्हटले आहे.
असे जरी असले, तरी हे सरकार पैशांच्या हव्यासापोटी अनेक भानगडी करू पाहत असून लोकांनी त्यासाठी दक्ष राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. या अधिवेशनात आपण लोकायुक्त संस्था अधिक सुदृढ करण्यासाठी विधेयक सादर केले असून याच लोकयुक्तांमुळे लेबरगेट, किनारपट्टी सफाई अशी सरकारची अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस आली, असा दावा करून सरदेसाई यांनी हे सरकार सध्या ही लोकायुक्त संस्थाच कमकुवत करू पाहत असल्याचा आरोप केला आहे.
गोव्यातील खासगी आस्थापनांत 80 टक्के गोमंतकीयांना रोजगार हे खासगी विधेयक आपण मांडले असून राष्ट्रीय शिक्षण धोरण, घरबांधणी भत्ता, लोहिया मैदान सौंदर्यीकरण तसेच अन्य लोकविरोधी निर्णयांवरून इतर विरोधकांच्या साहाय्याने सरकारला घेरू, असे त्यांनी म्हटले आहे. ऊस उत्पादक, स्वातंत्र्यसैनिक, मोटारसायकल पायलट, स्थानिक टॅक्सीचालक, कोविड योद्धे यांच्यावर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधातही आवाज उठविण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.